रत्नागिरी : जिल्ह्यातील तिवरे धरण फुटून आज एक वर्ष पूर्ण झालं. मात्र, त्या काळ रात्रीच्या आठवणी अजूनही जश्याच्या तश्याचं आहेत. ती काळ रात्र होती दोन जुलै 2019, वार सोमवार, रात्री 9 वाजून 35 मिनिटांनी धरण फुटलं आणि सर्व होत्याचं नव्हतं झालं. धरण फुटल्यामुळे पाण्याच्या प्रवाहात धरणाच्या बाजुला असलेली घरे वाहूण गेली. या घटनेत गावातील निष्पाप 22 जणांचा मृत्यू झाला.
धरण फुटलं आणि पाण्याच्या प्रवाहाच्या बाजुला असलेली ओवळी, रिक्टोली, आकले, दादर, नांदिवसे, कळकवणे यासह सात गावांमध्ये पाणी घुसलं आणि तिथे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. या पाण्यात शेती वाहून गेली. अजूनही स्थिती तशीच आहे. आज धरण फुटून एक वर्ष पूर्ण झालं. पण तिवरे वासियांच्या समस्या तश्याच आहेत. ज्यांची घरे या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली त्यांना प्रशासनाकडुन सहा महिन्यात पक्की घरे बांधून देऊ असे सांगण्यात आले. पण वर्ष झाले तरीही पक्की घरे नाहीत. सध्या उध्वस्त झालेले कुटुंब कंटेनरच्या घरामध्ये राहत आहेत. पण तीथेही त्यानां समस्या उदभवु लागल्यात. आम्हाला आमची पक्की घरे कधी मिळणार याची वाट पाहत आहेत. गावात पिण्यासाठी पाणी नाही तर काही ठिकाणी विजही नाही. वर्षातुन एकदा भात शेती करुन आपल्या पोटाची खळगी भरली जाते. पण ती शेतीही उध्वस्त झाली आहे. धरण फुटल्याने धरणाच्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर मातीचा गाळ शेतात आल्याने शेत जमीनही ओसाड पडली आहे. त्यामुळे करायचे तरी काय असा प्रश्न ग्रामस्थांसमोर उभा राहिला आहे.
सर्वांकडून केवळ आश्वासनं मिळाली..
धरण फुटल्यानंतर आजवर जेजे लोकप्रतिनिधी, शासकीय यंत्रणा आणि मंत्री महोदय येथे आले त्यांनी दिलेली आश्वासने ही केवळ कागदावरच राहिली. असे इथल्या ग्रामस्थांचे म्हणणे आहे. शेती नसल्याने खायला अन्न नाही. जे होतं ते सर्व या धरणात वाहून गेलं. शेती नसल्याने मुलाबाळांना काम धंदा नाही. सरकारने सांगितले की तुमच्या मुलांना नोकरीला लावू पण ते काहीच झाले नाही. पुर्नरवसनचा प्रश्न सुद्धा अजूनही सोडवला नाही. लोकांची खाण्यापिण्याची अडचणसुद्धा भागविली जात नाही. शेतीची नुकसान भरपाईसुद्धा सरकारने अजूनही दिलेली नाही. मुख्यमंत्री सहाय्यता निधीसुद्धा अजूनही दिलेला नाही. दहा महिन्यात दहा टोप्या लावण्याचे काम सरकार करित आहे, असे इथल्या ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
धरण फुटल्यानंतर धरणाच्या बाजुला असलेल्या गावागावांतील नळपाणी योजना निकामी झाल्या, त्याही अजून नवीन झालेल्या नाहीत. धरणाच्या पलीकडे असणाऱ्या बेंदवाडी, फणसवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर असणारा पूल वाहून गेला होता तोही पूर्ण झाला नाही. सरकारी काम आणि वर्षभर थांब याचा प्रत्यय आपल्याला इथ पाहायला मिळतोय.
Rural News | माझं गाव माझा जिल्हा | राज्याच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांचा आढावा