यवतमाळ : 'देव तारी त्याला कोण मारी' या म्हणीचा प्रत्यय यवतमाळमधल्या लहानग्यांच्या बाबतीत आला. पतंग काढताना तिसऱ्या मजल्यावरुन पडलेला मुलगा मित्राच्या अंगावर पडला. सुदैवाने यात दोघांनाही साधं खरचटलंसुद्धा नाही.

यवतमाळ जिल्ह्यातील पुसद शहरातील चौबारा चौकात ही आश्चर्यकारक घटना घडली. ही घटना सीसीटीव्ही फूटेजमध्ये कैद झाली आहे.

स्वप्नील झगरे हा 11 वर्षांचा मुलगा पुसदच्या कोषटवार शाळेत पाचवीत शिकतो. दिवाळीच्या सुट्ट्यांनिमित्त स्वप्नील  मित्रांसोबत चौबारा परिसरातील अतुल रेवणवार यांच्या घरासमोर खेळत होता. त्याला इमारतीच्या उंच टोकावर पतंग अडकलेला दिसला. पतंग काढण्यासाठी स्वप्नील छतावर चढला आणि त्याचा मित्र अमोघ तगलपल्लेवार खाली थांबला.

पतंग काढण्याच्या नादात स्वप्नीलचा तोल गेला आणि तो पतंगासह सर्व्हिस लाईनच्या वीजेच्या तारेवर पडला. त्याच्या झटक्यासरशी वीजेची तार तुटली आणि स्वप्नील खाली कोसळला.

काही क्षणांसाठी स्वप्नीलच्याही जीवाचा थरकाप उडाला. मात्र नेमका त्याचवेळी पतंग पकडण्यासाठी खाली धावलेला त्याचा मित्र देवदूत ठरला. स्वप्नील मित्राच्याच पाठीवर अलगद पडल्याने दोघांनाही साधं खरचटलंही नाही.

पुढच्या क्षणी उठून बसत स्वप्नील मित्रांसह पतंग घेऊन निघून गेला. भांगडे चिल्ड्रन हॉस्पिटलमधून नर्सची ड्यूटी आटपून स्वप्नीलची आई स्वाती झगरे घरी आली, तेव्हा स्वप्नीलच्या मित्रांनी ही घटना सांगितली. तेव्हा त्यांचा विश्वासच बसेना. आईने स्वप्नीलला पटकन कुशीत कवटाळले.

पाहा व्हिडिओ :