यवतमाळ : जिल्ह्याच्या महागाव तालुक्यातील काळी टेंभी येथे गौण खनिज तस्करीला आळा घालण्यासाठी गेलेल्या तलाठी, मंडळ अधिकारी आणि वाहन चालकांवर रेती तस्करांनी जीवघेणा हल्ला (Yavatmal Crime) केला. हि खळबळजनक घटना बुधवार, 20 डिसेंबरच्या मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या हल्ल्यात तलाठी गणेश मोडके गंभीर जखमी झाले. तर इतर मंडळ अधिकारी, वाहन चालक किरकोळ स्वरूपात जखमी झाले आहेत. या गंभीर घटनेमुळे महसूल विभागात चांगलीच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास करत पुढील कारवाई सुरू केली आहे. या प्रकरणी अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल करून पोलीस आरोपींचा शोध घेत आहे. 


अवैध उत्खनन व वाहतूक करणाऱ्या तस्करांचा सुळसुळाट


यवतमाळच्या महागाव तालुक्याच्या परिघात मोठ्याप्रमाणात गौण खनिजांची चोरी होत असल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. त्यात अवैध पद्धतीने उत्खनन व वाहतूक करणाऱ्या तस्करांचा सुळसुळाट वाढल्याचे निदर्शनास आले. परिणामी, बुधवारी 20 डिसेंबरच्या दुपारी जिल्हाधिकारींनी महागाव तहसील कार्यालयात आढावा बैठक घेतली. या बैठकीत तालुक्यातील गौण खनिज चोरी बाबत फुलसावंगी परिसराचे तलाठी व मंडळ अधिकारी यांना चांगलेच धारेवर धरले होते. ही बाब गांभीर्याने घेता आणि संभाव्य पुढील कार्यवाही टाळण्यासाठी तहसीलचे पथक बुधवारी रात्री दहा वाजता फुलसावंगी परिसरामध्ये कारवाईच्या निमित्याने गस्त घालत होते. दरम्यान तहसील कार्यालयाचे पथक गस्तीवर असतांना काळी टेंभी येथे काही रेतीचे अवैध उत्खनन व वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती त्यांना प्राप्त झाली. या माहितीच्या आधारे या पथकाने आपला मोर्चा त्या दिशेने वळवला. 


तलाठीसह तहसीलच पथकावर तस्करांचा जीवघेणा हल्ला 


 दरम्यान, तहसील कार्यालयाचे पथक काळी टेंभी येथे पोहचतांच माती भरून ते चोरून नेत असणारे काही ट्रॅक्टर त्यांच्या हाती लागले. पथकाने या अवैध पद्धतीने उत्खनन व वाहतूक करणाऱ्या तस्करांची विचारपूस सुरू केली.  त्यानंतर अचानकपणे गौण खनिजाची चोरटी वाहतूक करणाऱ्या इसमानी तलाठी मंडळ अधिकारी व शासकीय वाहनाचे चालक आडे यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. या अचानक झालेल्या हल्ल्यात तलाठी गणेश मोडके हे गंभीर जखमी झाले. या हल्यात त्यांच्या डोक्याला जबर मार बसला असून या हल्ल्यात ते रक्तबंबाळ अवस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल झाले. तसेच या पथकातील इतर मंडळाधिकारी संजय नरवाडे आणि वाहन चालक आडे यांना देखील या तस्करांनी जबर मारहाण केली. या घटनेची माहिती महागाव पोलिसांना देण्यात आली असून या घटनेमुळे महसूल विभागात चांगलीच खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकरणाची माहिती मिळाल्या नंतर अज्ञात आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्याची कार्यवाही सुरू केली असून  पोलीस आरोपींचा शोध घेत आहे. 


ही बातमी वाचा: