बीड:  23 डिसेंबर रोजी बीडमध्ये (Beed) मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची निर्णायक इशारा सभा होत आहे. दरम्यान, याच सभेची जयंत तयारी सुरु असून, शहरातील बीड बायपास रोडवर या सभेचं आयोजन करण्यात आले आहे. तर, सभास्थळाची पाहणी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी केली आहे. विशेष म्हणजे, जरांगे यांच्या सभेच्या अनुषंगाने वरिष्ठ अधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाल्यानंतर सभेच्या दिवशी धुळे-सोलापूर महामार्गावरील (Dhule-Solapur Highway) वाहतुकीमध्ये मोठे बदल करण्याचा निर्णय झाला आहे. 


मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी करत, मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 24 डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. परंतु, ही मुदत संपण्यापूर्वी 23 डिसेंबर रोजी बीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांची निर्णायक इशारा सभा आयोजित करण्यात आली आहे. याच सभेमधून 24 डिसेंबरनंतरची आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे. त्यामुळे बीडमधील सकल मराठा बांधवांच्या वतीने या सभेची जय्यत तयारी करण्यात येत आहे. तब्बल शंभर एकरावर हि सभा होणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे. 


सभेच्या पार्श्वभूमीवर पोलीस अलर्ट...


काही दिवसांपूर्वी बीडमध्ये मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मोठी जाळपोळ आणि दगडफेक झाली होती. त्यामुळे, मनोज जरांगे पाटील यांची सभा शांततेत पार पाडावी यासाठी पोलिसांनी आतापर्यंत 400 जणावर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. तर, सभेच्या दिवशी मोठा पोलीस बंदोबस्त बीडमध्ये तैनात करण्यात येणार आहे. तर, जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीत धुळे-सोलापूर या महामार्गावर मोठे बदल करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. 


छत्रपती संभाजीनगरहून धाराशिवला जाण्यासाठी कोणता मार्ग?


छत्रपती संभाजीनगरहून बीड, धाराशिवला जाणारी वाहनं पैठण-खरवंडी-शिरूर-पाटोदा-मांजरसुंबा-धाराशिव या मार्गे किंवा संभाजीनगर-गढी-माजलगाव-तेलगाव-धारूर-केज मांजरसुंबामार्गे धाराशिवच्या दिशेने वळवण्यात आली आहेत. तर, धाराशिवून जालन्याला जाण्यासाठी धाराशिव-मांजरसुंबा-केज-धारूर-तेलगाव-माजलगाव-जालना या मार्गे किंवा धाराशिव-मांजरसुंबा-केज-तेलगाव-माजलगाव-गढी-गेवराई या मार्गाचा वापर करून प्रवास करणाऱ्या वाहनांना जालन्याकडे जाता येईल.


धाराशिवहून संभाजीनगरला जाण्यासाठी कोणता मार्ग?


धाराशिवहुन छत्रपती संभाजीनगरला जाण्यासाठी धाराशिव-मांजरसुंबा-पाटोदा-शिरूर-खरवंडी-पैठण-छत्रपती संभाजीनगर किंवा मांजरसुंबा-पाटोदा-शिरूर-पाथर्डी पैठण या मार्गाचा वापर करावा लागणार आहे. तर, जालन्याहून नगरला जाण्यासाठी गेवराई-पाडळसिंगी उड्डाणपुलाखालून मादळमोही-खरवंडी-नगर असे जाता येईल. तर, परळीहून बीडमध्ये येताना परळी-तेलगाव-माजलगाव-गढी या रस्त्याचा वापर प्रवाशांना करावा लागणार आहे.


सभेच्या ठिकाणी तब्बल 4 लाख पाणी बॉटल


बीडमध्ये 23 डिसेंबरला होणाऱ्या मनोज जरांगे यांच्या सभेची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, सभेसाठी येणाऱ्या मराठा बांधवांसाठी जेवणाची आणि पाण्याची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष सभेच्या ठिकाणी तब्बल 4 लाख पाण्याच्या बॉटलची व्यवस्था केली जाणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Manoj Jarange Patil : राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन, शेतकऱ्यांशी साधला संवाद