यवतमाळ: शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या स्टेट बँकेला यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दणका दिला.

जिल्हाधिकाऱ्यांनी एसबीआयमधील सहा महत्वाची खाती बंद करुन, बँकेसोबतचे आर्थिक व्यवहार तोडण्याची भूमिका घेतली आहे.

नियोजन, सामान्य निवडणूक, आपत्ती व्यवस्थापन, खनिकर्म, पुनर्वसन, अधीक्षक जिल्हा कार्यालय अशा सहा विभागातील शासकीय खाते सेंट्रल बँकेसह युनियन बँकेत काढण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

जिल्ह्यात एसबीआयच्या शाखांना खरिपात 571 कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्याचं उद्दिष्ट दिलं होतं. मात्र त्यापैकी केवळ 51 कोटी रुपयांचे कर्ज वाटप झाल्यानं देशमुख नाराज झाले.

त्यामुळेच त्यांनी कडक भूमिका घेत, शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या  स्टेट बँकेला चांगलाच  दणका दिला.

अनेक बँका शेतकऱ्यांना कागदी घोडे नाचवायला सांगून जेरीस आणतात. त्यामुळे अनेक शेतकरी पीक कर्जाच्या फंदात पडत नाहीत. मात्र शेतकऱ्यांना शेतीकामासाठी पैसा आवश्यक असतो. त्यामुळे ते खासगी सावकाराच्या दारी जातात. त्याचा परिणाम शेतकरी सावकारी फासातून बाहेरच पडत नाही.

हे दुष्टचक्र भेदण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांसाठी सहज कर्ज उपलब्ध करुन दिलं आहे. मात्र बँका हे कर्ज वाटपात कुचराई करत असल्याचं दिसून येतं.