बीड : हिटरचं उकळते पाणी अंगावर सांडल्याने तीन लहान मुलींचा मृत्यू झाला आहे. बीडमधील अंबाजोगाई तालुक्यात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. यात एक महिलाही गंभीर भाजली आहे.


अंबाजोगाई तालुक्यातील भतानवाडीमध्ये ही घटना घडली आहे. गावात दोन दिवसापासून वीज नसल्याने सकाळी सुरु केलेल्या पाण्याच्या हिटरचे बटण तसेच सुरु होतं. मध्यरात्रीच्या सुमारास अचानक वीज आली आणि हे हिटर सुरु झाला. त्यातील पाणी उकळून बाहेर आले. हे पाणी पडल्याने हिटर ठेवलेल्या स्टूलखालील सिमेंटचं गट्टू खचलं आणि हिटर कलंडून उकळते पाणी जवळच गाढ झोपेत असणाऱ्या मुली आणि त्यांच्या मामींच्या अंगावर पडले. उकळतं पाणी अंगावर सांडल्याने मुलींचा मृत्यू झाला.

दरम्यान या दुर्घटनेत मुलींची मामी या घटनेत गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर लातूरमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.