यवतमाळ : यवतमाळ-अमरावती मार्गावरून जाताना एका ट्रकच्या मागे घिरट्या घालत पक्षी एका व्यक्तीच्या येण्याची आतुरतेने रोज पहाटे वाट पाहत असतात. कारण त्यांचा दोस्त मागील 15 वर्षांपासून त्यांच्यासाठी घरून न चुकता रोज काहीतरी हक्काने घेऊन येणार हे पक्षांनाही माहितीय. रहिमभाई असं त्या पक्षीमित्राचं नाव आहे. यवतमाळ जिल्ह्यातील नेरच्या मालखेड गावाजवळ हा प्रसंग घडतो.
अशी झाली सुरुवात
मागील 20 वर्षांपासून ट्रान्सपोर्ट व्यवसायात असलेले मिर्झा रहिमबेग यांची गाडी एकेदिवशी मालखेड गावााजवळ बंद पडली. त्यामुळे ते गाडी दुरुस्त होईपर्यंत गाडीजवळ थांबले होते. त्यांना भूक लागल्याने त्यांनी जवळचे बिस्किट खाण्यास सुरुवात केली. त्याचवेळी भुकेने व्याकुळ झालेला एक कावळा त्यांच्याकडे आला. त्याला रहीमभाई यांनी जवळचे एक बिस्कीट दिले. त्यानंतर तो कावळा पुन्हा दुसरे बिस्किट मिळेल या आशेने पाहु लागला पुन्हा राहिमभाई यांनी बिस्किट दिले.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा कावळा त्याच ठिकाणी आला आणि पुन्हा रहिमभाई यांनी त्याला बिस्किट दिले. तिसऱ्या दिवशी कावळा आपल्यासोबत आणखी काही कावळे घेऊन आला. त्यावेळी राहिमभाई यांनी घरची खिचडी आणि काही बिस्किटं त्यांना दिली. मग दिवसागणिक कावळ्यांची संख्या वाढत गेली आणि आज असंख्य कावळे राहिमभाई यांच्या येण्याची अशीच आतुरतेने आस लावून असतात.
15 वर्षापासून पत्नीची अशी सेवा
ट्रान्सपोर्ट व्यवसाय असल्याने रहिमबेग यांना प्रत्येक ठिकाणी वेळेत सामान पोहोचवण्यासाठी यवतमाळच्या घरून भल्या पहाटे निघावं लागतं. सकाळी 5.45 च्या सुमारास घरून खिचडी बनवून आणतात तर कधी शेव, पापडी, बिस्किट असं अन्न आणतात. रहिमभाई यांच्या पत्नी त्यांच्या या अनोख्या मित्रांसाठी न चुकता ते आवडीने खिचडी अन्य पदार्थ 15 वर्षांपासून तयार करून देतात हे विशेष.
पक्षांसोबतच्या दोस्तीने जीवनात आनंद मिळाला
मालखेड गावाजवळच्या उंचटेकडी भागात पोहोचताच रहिमभाई गाडीच्या हॉर्न वाजवतात. तो आवाज ऐकताच कावळ्यांचा थवा मग मित्र आल्यावर जिकडे असेल तिकडून गाडीच्या पुढे मागे पाठलाग करत येतात. मग काय असंख्य कावळ्यांच्या थवा रहिमभाई यांनी आणलेल्या खाऊवर तुटून पडतो. अवघ्या काही मिनिटात आणलेला खाऊ संपतो. माणसांपासून कायम लांब असणारे पक्षी कधी रहिमभाई अंगाखांद्यावर खेळतात, असे रहिमभाई सांगतात. या पक्षांसोबतच्या दोस्तीने जीवनात आनंद मिळाला असे ते आवर्जून सांगतात.
लहानग्यांनाही लागला रहिमभाईंचा लळा
असंख्य कावळ्यांची नियमित भूक भागवणारे रहिम भाई यांचा लळा या रस्त्याने येताना उत्तरवाढोना, सोनवाढोना, मालखेड, कोलुरा येथील लहान बालकांना देखील लागला आहे. रोज सकाळी नियमित वेळेत रहीमभाईच्या ट्रकची ओढ या भागातील बालकांना असते. कारण त्यांनाही रहिमभाई पक्षांप्रमाणे लहान बालकांना खाऊ वाटत येतात.