यवतमाळ : माणुसकीला काळीमा फासणारी घाटंजी तालुक्यात घडली होती. आजोबाने 11 वर्षीच्या नातीवरच अत्याचार केल्याची घटना घडली होती. या गुन्ह्यात जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपी आजोबाला जन्मठेप आणि सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे.


विशेष म्हणजे या घटनेतील पीडित मुलीच्या आईचा मृत्यू झाला होता. आईचा मृत्यू झाल्यानंतर पीडित मुलगी तिची लहान बहिणीसह वडिलांसोबत राहत होती. तर तिचे आजोबा मारेगाव तालुक्यातील एका गावात राहत होते. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्याने पीडित मुलगी तिच्या बहिणीसह आजोबांकडे राहायला गेली. तिथे आजोबाने वारंवार पीडितेवर अत्याचार केला आणि ही बाब कुणाला सांगू नकोस म्हणून धमकावले.


पीडित मुलगी पुन्हा आपल्या गावात वडिलांकडे राहायला आली आणि त्यानंतर काही दिवसात तिचे वडील मरण पावले. त्यामुळे तिचे आजोबा तिच्याच गावी राहायला आले. तिथेही तो नराधम आजोबा वारंवार नातीवर अत्याचार करीत होता. यातूनच पीडितेला गर्भधारणा झाली. दरम्यान शाळेच्या झेंडावंदन कार्यक्रमामध्ये मुलीला भोवळ आली. तेव्हा गावचे सरपंच आणि आजीने विचारपूस केली तेव्हा आजोबाने वारंवार अत्याचार केल्याचे पीडितेने सांगितले.
 
या प्रकरणी आजीच्या तक्रारीवरून घाटंजी पोलिसात गुन्हा दाखल झाला. या प्रकरणात 7 साक्षीदार आणि वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष कोर्टात महत्त्वाची ठरली. या प्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीश एम. मोहिउद्दिन यांनी नातीवर अत्याचार करणाऱ्या आजोबाला आमरण जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.