यवतमाळ : यवतमाळमधल्या नरभक्षक वाघिणीचा ‘लांडगा आला रे आला’ अशी गत झालीय. कारण, वडकी - कारेगावमध्ये या वाघिणीच्या पावलांचे ठसे आढळल्याची बातमी आली आणि वन विभागाचे अधिकारी वाघिणीच्या शोधासाठी तात्काळ घटनास्थळाकडे रवाना झाले. अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता ते ठसे तरसाचे निघाले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी शोधमोहीम हाती घेतली असता कपाशीच्या शेतात दोन पिल्लं आढळली.


यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील वडकी - कारेगाव परिसरात तरसाचे हे दोन पिल्लं आढळून आले. वन विभागाला याची माहिती मिळताच वन अधिकारी आणि कर्मचारी या परिसरात आले. कारेगाव भागातील शेतकरी सुहास तेलतुंबडे यांच्या कपाशीच्या शेतात हे दोन पिल्लं आढळले.

दोन पिल्लांसह त्यांची आई (मादी) तरसही सोबत होती. शेतात कापूस वेचणी करत असलेल्या मजूर महिलांना पाहून तरस मादीने त्यांच्यावर प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र मजुरांची संख्या जास्त असल्याने त्या मादीने पळ काढला. पण पिल्लं लहान असल्याने त्यांना पळता आलं नाही.

सदर पिल्लं हे पाच दिवसांचे असल्याचं वन अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. पण पावलांच्या ठशावरुन वाघिणीचा शोध घेण्याचा अंदाज चुकल्याचं दिसत आहे. वन विभागाने या नरभक्षक वाघिणीला पकडण्यासाठी कंबर कसली आहे. याच्यासाठी दिवस-रात्र मेहनत घेतली जात असली तरीही अद्याप या शोधमोहीमेला यश आलेलं नाही.