मुंबई: शासकीय मदतीचा चेक तीन वेळा बाऊन्स होऊनही, बँकेने थेट लाभार्थ्यालाच दंड ठोठावल्याची बातमी एबीपी माझाने प्रसिद्ध केल्यानंतर, त्याची प्रशासनाने तातडीने दखल घेतली.


तसंच ही प्रशासनाची नव्हे तर बँकेची चूक असल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

याबाबत स्टेट बँकेने दिलगिरी व्यक्त केली आहे. तसंच संगणकीय त्रुटीमुळे चेक जमा झाला नसल्याचा खुलासा स्टेट बँकेने तहसीलदारांकडे दिला आहे.

इतकंच नाही तर संबंधित धनादेश 8 तारखेला संबंधित खात्यात जमाही झाल्याचं सांगण्यात आलं आहे.



काय आहे प्रकरण?

यवतमाळच्या गौतमनगरात राहणाऱ्या सपना इंगळे या महिलेचे पती दीपक इंगळे यांचा 14 मार्च 2017 रोजी विजेचा करंट लागून मृत्यू झाला होता. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सामाजिक अर्थसहाय्य योजनेतून 20 हजार रुपयांचा धनादेश मिळाला. तहसीलदारांच्या स्वाक्षरीचा हा धनादेश घेऊन सपना इंगळे तीन वेळा स्टेट बँकेत गेल्या. मात्र तिन्ही वेळा चेक बाऊन्स झाला.

सामाजिक अर्थसहाय्य योजनेतून अपघातग्रस्तांना केलेल्या शासकीय मदतीचा हा चेक 14 डिसेंबर रोजी वितरित करण्यात आला होता.

मात्र धनादेश घेऊन गेल्यावर संबंधित खात्यात पुरेसे पैसेच नाही, या कारणाने शासकीय मदतीचा चेक बाऊन्स झाला होता.

धक्कादायक म्हणजे धनादेशही बाऊन्स होतो, हे पाहून गरीब लाभार्थी महिला संभ्रमात पडली, मात्र त्यावरही बँकेने चेक देणाऱ्याऐवजी लाभार्थ्यावरच दंड आकारला.

ही बातमी एबीपी माझाने प्रकाशित केली होती. त्याची तातडीने दखल घेऊन तहसिलदारांनी चौकशी करुन, बँकेकडून खुलासा मागवला.

संबंधित बातमी

शासकीय मदतीचा चेक 3 वेळा बाऊन्स, बँकेचा लाभार्थ्यालाच दंड