यवतमाळ : पब्जी गेममुळे एका 22 वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना यवतमाळ जिल्ह्यात घडली आहे. यवतमाळच्या नेर तालुक्यातील पिंपरी मुखत्यारपूर या गावात पब्जी गेमच्या आहारी गेलेल्या निखिल पिलेवान या युवकाने आपलं आयुष्य संपवलं. निखिलने आत्महत्या केली त्यावेळी घरात कोणी नव्हतं.


निखिल पिलेवान हा सतत पब्जी गेम खेळत असे आणि या गेमच्या आहारी गेल्यामुळे त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली, असं गावातील सरपंच प्रवीण सोनटक्के यांनी सांगितलं आहे.


निखिल हा पुणे येथील एका खासगी कंपनीमध्ये कामावर होता. लॉकडाऊनच्या काळात तो गावाकडे आला होता. मागील तीन महिन्यांपासून निखिलच्या हाताला कुठलंही काम नसल्यामुळे तो दिवस-रात्र पब्जी हा गेम खेळत होता. दररोज बराच वेळ तो मोबाईल फोनवर गेम खेळायचा. या गेमच्या आहारी गेल्यामुळे आज त्याने टोकाचे पाऊल उचलत, घरी कोणी नसतात आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.


या घटनेची संदर्भात नेर पोलिसात तक्रार देण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे. या गेमवर सरकारने बंदी आणावी, अशी मागणी सुद्धा सरपंच प्रवीण सोनटक्के यांनी केली आहे. तसंच भविष्यात अशाप्रकारच्या घटनांना सामोरं जाऊ नये, यासाठी आमच्या गावातील तरुणांनी हा गेम कधीही न खेळण्याचा निर्णय घेतल्याचंही त्यांनी सांगितलं.