शेतीमालाला हमीभाव मिळावा या आणि अन्य मागण्यांसाठी सिन्हा यांनी सोमवारपासून अकोल्यात आंदोलन सुरु केलं आहे.
गेल्या तीन दिवसांपासून अकोला पोलीस मैदानात यशवंत सिन्हा आणि शेतकरी ठाण मांडून आहेत. मात्र अद्यापही त्यांच्या मागण्यासंदर्भात सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद आलेला नाही.
आज भाजप नेते शत्रुघ्न सिन्हा, अरुण शौरी यासारखी मंडळीही यशवंत सिन्हांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा देणार आहेत.
एकीकडे भाजपचेच ज्येष्ठ नेते सरकारविरोधात रस्त्यावर आले असताना दुसरीकडे विरोधकांनीही यशवंत सिन्हांच्या आंदोलनाला पाठिंबा देत सरकारवर निशाणा साधत आहेत.
त्यामुळे अकोल्यातील आंदोलनाचा वाढता प्रतिसाद सरकारसाठी डोकेदुखी ठरण्याची चिन्हं आहेत.
यशवंत सिन्हांचं आंदोलन
केंद्र सरकार असो वा राज्य सरकार दोघांनीही सत्तेवर येण्यापूर्वी शेतकर्यांना विविध आश्वासणे दिली.पण त्यातील एकही आश्वासन दोन्ही सरकारांनी पूर्ण केले नाही, असा आरोप करत माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी अकोल्यात जनआंदोलन सुरु केलं.
यशवंत सिन्हा यांनी सरकारकडे एकूण सात मागण्या केल्या होत्या. आंदोलकांच्या सातपैकी सहा मागण्या सककारकडून मान्य करणात आल्या आहेत. मात्र नाफेडने शेतमाल किमान आधारभूत किमतीने खरेदी करण्यासंदर्भात ठोस आश्वासन दिल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्यावर आंदोलक अजूनही ठाम आहेत.
महत्त्वाच्या मागण्या
1) शेतकऱ्यांच्या सर्व शेतमालाची नाफेडनं किमान हमीभावानं खरेदी करावी.
2) बोंडअळीग्रस्त कापूस शेतकऱ्यांचं तातडीने सर्वेक्षण करून एकरी ५० हजारांची मदत द्यावी.
यशवंत सिन्हा ताब्यात आणि सुटका
दरम्यान, या आंदोलना दरम्यान यशवंत सिन्हा यांच्यासह आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं होतं.
मागण्यांच्या पूर्ततेसाठी यशवंत सिन्हांनी अकोल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना संध्याकाळी पाच वाजेपर्यंतचा अल्टिमेटम दिला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनांवर समाधानी नसल्याचं सांगत यशवंत सिन्हांनी आंदोलन मागे घेण्यास नकार दिला. त्यामुळे सिन्हा यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
आंदोलनावर यशवंत सिन्हा ठाम
अकोल्यात आंदोलन छेडल्यानंतर पोलिसांनी सिन्हा यांच्यासह आंदोलकांना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या सुटकेची तयारीही दाखवली. मात्र, त्यांनी नकार देत झाडाखाली झोपणं पसंत केलं. शेतमालाच्या किमान आधारभूत किंमतीबाबत ठोस आश्वासन दिल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्यावर आंदोलक ठाम आहेत.
स्वतःच्या सरकारविरोधात आंदोलन, भाजप नेते यशवंत सिन्हा ताब्यात
पीएशी बोला, फडणवीसांचा सिन्हांना निरोप : पटोले
यादरम्यान यशवंत सिन्हा यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र फडणवीस यांनी फोनवर येणं टाळून सिन्हांना पीएशी बोला असा निरोप दिला. त्यामुळे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनाच डावलल्याची भावना आहे, असा आरोप भाजपचे गोंदियाचे खासदार नाना पटोले यांनी केला आहे.
…तर वरुण गांधी, अरुण शौरी, शत्रुघ्न सिन्हा अकोल्यात!
दुसरीकडे, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी अकोला पोलिस मुख्यालयात ठिय्या मांडून बसलेल्या यशवंत सिन्हा यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर अरुण शौरी, शत्रुघ्न सिन्हा आणि वरुण गांधी पाठिंब्यासाठी थेट अकोल्यात येणार आहेत. खासदार नाना पटोले यांनी ही माहिती दिली आहे.
यशवंत सिन्हांची उद्धव ठाकरे आणि पवारांशी फोनवर चर्चा
शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी सरकाविरोधात अकोल्यात आंदोलन करणारे भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी फोनवर चर्चा केली. शेतकऱ्यांच्या मागण्यांसदर्भात या नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचंही कळतं.
शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आमरण उपोषण करु, असा इशारा माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी दिला आहे.
काँग्रेसचा पाठिंबा
दरम्यान, यशवंत सिन्हा यांच्या या आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा असल्याचं प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितलं. देशाच्या एका माजी अर्थमंत्र्यांना पोलिस गाडीत बसवून नेणं हे कृत्य अशोभनीय असल्याचं चव्हाण म्हणाले.
संबंधित बातम्या
यशवंत सिन्हांची उद्धव ठाकरे आणि पवारांशी फोनवर चर्चा
स्वतःच्या सरकारविरोधात आंदोलन, भाजप नेते यशवंत सिन्हा ताब्यात