पंढरपूर : गणित हा विषय तसा अनेकांच्या नावडीचा. मात्र हाच विषय आवडीचा करण्यासाठी थेट जपान हा देश पुढाकार घेतो आहे. यासाठी ते आधुनिक पद्धतीचा वापर करणार आहेत.

भारतात आधुनिक पद्धतीने गणित शिकविण्यासाठी जपानच्या टोपान’ कंपनीने यारुकी तंत्रज्ञान आणलं आहे. देशातील एकूण चार शाळांची निवड करण्यात आली आहे. यात सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरमधील लोटस इंग्लिश स्कुलचा समावेश आहे.

या करारामुळे शाळेतील मुले आणि शिक्षक उत्साहित असून नव्या पद्धतीने गणितं शिकण्यासाठी आता मुलेही आतुर झाली आहेत. जपानच्या टोपान प्रिंटिंग या कंपनीने अध्यक्ष शिंगो कनको आणि लोटसचे बब्रुवान रोंगे यांच्यात नुकताच हा करार झाल. 

भारतातील ICSC, CBSC आणि राज्य महामंडळाच्या या चार शाळा असून, आपला अभ्यासक्रम जपानच्या आधुनिक तंत्रज्ञानाने सोपा करुन शिकवला जाणार आहे.

मुलांच्या मनात असलेली गणिताची भीती दूर होऊन त्यांना या विषयातील जिज्ञासा आणि आवड वाढीस लागेल, असा दावा या कंपनीकडून करण्यात आलेला आहे.

जपानच्या कंपनीने विकसित केलेल्या टॅब्लेटवर आधारित अभ्यास पद्धतीला यारुकी हे नाव देण्यात आले आहे. यात मुलांना प्रशिक्षण देऊन तीन महिने यावर काम करावे लागणार आहे. अभ्यासक्रम सुरु करण्यापूर्वी आणि अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर त्यांची ऑनलाईन चाचणी घेतली जाईल.

मुलांना देण्यात आलेल्या टॅबवरुन गणिताचा अभ्यास शिकवला जाणार असून त्यांचा घराचा अभ्यास देखील याच टॅबवर करावा लागणार आहे. हे सर्व टॅब ऑनलाईन जोडले गेल्याने शिक्षक कुठेही या मुलांच्या अडचणी सोडवू शकतील. यावरुनच त्यांचा केलेला अभ्यास देखील तपासला जाणार आहे.

या तीन महिन्यातील मुलांच्या प्रगतीवरुन पुढील दिशा ठरवली जाणार आहे. सुरुवातीला चौथीच्या वर्गासाठी हे प्रात्यक्षिक घेतले जाणार असून नंतर गणितासोबत शास्त्र विषयाचा देखील यात समावेश केला जाणार आहे.

सध्या यारुकीतंत्रज्ञान हे फक्त चौथीच्या वर्गासाठीच भारतात आणण्यात आलेले आहे. लोटससारख्या ग्रामीण भागातील शाळेतील मुलांना याचा चांगला फायदा मिळेल, अशी पालकांची देखील अपेक्षा आहे.