कराड : यशवंतराव चव्हाण यांच्या स्वप्नातल्या महाराष्ट्राकडे राज्याची वाटचाल सुरु असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी त्यावर बोचरी टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांचं हे विधान म्हणजे यंदाच्या वर्षातला सर्वात मोठा विनोद असल्याचं पवारांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्र्यांचं नेमकं वक्तव्य काय?

यशवंतरावांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवण्याचं काम सरकारकडून सुरु : मुख्यमंत्री

‘महाराष्ट्रात राहणारा जो सामान्य माणूस आहे त्या सामान्य माणसाच्या जीवनासाठी यशवंतराव चव्हाणांनी जे स्वप्न पाहिलं होतं. ते स्वप्न पूर्ण करण्याकरिताच महाराष्ट्रातील सध्याचं सरकार सध्या काम करत आहे. राजकारणाचा पुढाकार आणि पुरस्कार स्वर्गीय यशवंतरावांनी घेतला होता. ते सुसंस्कृत राजकारण करत सामान्य माणसाला, शेतकऱ्याला आणि समाजातील वंचितांना न्याय देण्याचं काम आम्ही करु हीच प्रेरणा मी येथून नेत आहे.’ असं मुख्यमंत्री प्रीतीसंगमावर बोलताना म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या याच वक्तव्यावर शरद पवारांनी टोला हाणला. पाहा पवार नेमकं काय म्हणाले.

हा तर या वर्षातील सर्वात मोठा विनोद आहे : शरद पवार

‘चव्हाण साहेबांना अभिप्रेत असलेल्या महाराष्ट्रासाठी हे सरकार काम करत आहे. असं मुख्यमंत्र्यांनी म्हणणं हा या वर्षातील सर्वात मोठा विनोद आहे.’ असा टोला शरद पवारांनी हाणला.

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या ३३व्या पुण्यतिथीनिमित्त आज अनेक दिग्गज नेत्यांनी कराड इथल्या यशवतंरावाच्या प्रीतीसंगम या समाधीस्थळाचं दर्शन घेतलं.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पचक्र अर्पण करुन यशवंतराव चव्हाणांना आदरांजली वाहिली.  त्यानंतर काहीच वेळात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार प्रीतीसंगमावर पोहोचले.

VIDEO :



संबंधित बातम्या :

‘नांदता येत नसेल तर वेगळं व्हावं’, शरद पवारांची शिवसेनेवर टीका