World Health Day 2023 : राज्यातील (Maharashtra News) सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू ठेवून आरोग्यविषयक विविध योजना राबविल्या (Health Department) जात आहेत, असे सांगत आज जागतिक आरोग्य दिनानिमित्त (World Health Day) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी राज्यातील जनतेला निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. जागतिक आरोग्य दिनानिमित्त आजपासून राज्यात आठवडाभर 'सुंदर माझा दवाखाना' हा उपक्रम सुरू होत आहे. या उपक्रमांतर्गत सामान्यांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्याचं आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी यानिमित्तानं केलं आहे.


आरोग्यविषयक आव्हानाला ताकदीनं सामोरं जाणाऱ्या आरोग्य क्षेत्रातील डॉक्टर्स, नर्स, आरोग्य कर्मचारी यांचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानले आहेत. 


मुख्यमंत्र्यांनी जागतिक आरोग्य दिनानिमित्त शुभेच्छा देताना म्हटलं आहे की, राज्यात आरोग्याच्या क्षेत्रात आमुलाग्र बदल घडवून आणण्याच्या दिशेनं आम्ही पावलं टाकली आहेत. राज्यात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याच्या माध्यमातून नागरिकांना मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. मुंबईमध्ये देखील सुमारे 160 हून अधिक आपला दवाखाना सुरू झाले आहेत.


मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षानं रुग्ण सेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात आरोग्याचा प्रकाश आणला आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षामार्फत गेल्या नऊ महिन्यांत 6200 रुग्णांना एकूण 50 कोटी 55 लाख रुपयांची मदत दिली आहे. माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानात 4 कोटी महिला-मुलींची आरोग्य तपासणी, औषधोपचार करण्यात आले. महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजनेत विमा संरक्षण दीड लाखांवरून पाच लाख रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता पाच लाख रुपयांपर्यंत उपचार घेता येणार आहे. शिवाय या योजनेत नवीन 200 रुग्णालयांचा  समावेश करणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.


दरवर्षी 7 एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. 'समान आरोग्य सेवा' हे यंदाच्या जागतिक आरोग्य दिनाचे घोषवाक्य आहे. शासकीय रुग्णालये आणि आरोग्य संस्थांमध्ये सर्वांना समान सुविधा उपलब्ध करून जास्तीत जास्त रुग्णांनी सार्वजनिक रुग्णांलयांच्या सुविधांचा वापर केला पाहिजे, याविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागानं या निमित्त या वर्षी  राज्यातील सर्व सरकारी आरोग्य केंद्रांमध्ये स्वच्छता मोहीम राबवत 7 ते 14 एप्रिल दरम्यान 'सुंदर माझा दवाखाना' हा उपक्रम राज्यभर राबविणार आहे. त्यामाध्यमातून सामान्यांना आरोग्याच्या दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.