नांदेड  :  कोरोनानंतर राज्यात पहिला मराठा मूक मोर्चा छत्रपती संभाजी राजेंच्या उपस्थितीत काढणारे आणि स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष माधव देवसरकर यांच्यावर विनयभंगाचा आरोप केला जात आहे. त्यांच्या सहकाऱ्यानंचं आपल्या पत्नीवर वाईट नजर ठेवून विनयभंग केल्याचा आरोप नांदेड येथे पत्रकार परिषदेत केला आहे.


स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड या संघटनेच्या नावानं कार्य करणारे आणि नांदेड येथील मराठा मोर्चाचे प्रतिनिधित्व करणारे सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळख असणाऱ्या माधुराव देवसरकर यांनी माझ्यासोबत असलेल्या संघटनात्मक संबंधाचा फायदा घेत माझ्यासोबत असभ्य आणि अश्लील वर्तन केले. तसेच तिचा विनयभंग केला असल्याचा आरोप त्यांच्या सहकाऱ्याच्या पत्नीनं केलाय. त्यामुळे जिल्ह्यातील मराठा संघटना आणि कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सामाजिक कामाच्या निमित्तानं देवसरकर हे कुटुंबाशी निगडित होते. त्या गोष्टीचा फायदा घेत पदाधिकऱ्यांच्या पत्नीशी लगट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. परंतु, विकृत मानसिकता ठेऊन देवसरकर यांनी या पवित्र संबंधाचा गैरफायदा घेत सहकाऱ्याच्याच पत्नीवर वाईट नजर ठेवली. दरम्यान एका दिवशी रात्री उशिरा त्याच्या पत्नीच्या वैयक्तिक मोबाईलवर आपली फेसबुकची फ्रेंड रिक्वेस्ट का स्वीकारत नाही? असा मेसेज टाकला. तर एका दिवशी कार्यक्रम असल्याच्या बहाण्यानं ते घरी येऊन वाईट नजरेनं माझ्या पत्नीकडं डोळ्यानं इशारा केला आणि लगट करण्याचा प्रयत्न केला, असे आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आले आहेत. 


सदर प्रकरणी पोलिसांत तक्रार देऊनही गुन्हा दाखल होत नसल्यानं तक्रारकर्त्यांनी माध्यमांसमोर हे दावे करत दाद मागितली आहे. त्यानंतर तक्रार दिल्याच्या आठ दिवसानंतर नांदेड पोलिसांनी अखेर विविध कलमान्वये संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष माधव देवसरकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.


सामाजिक नेता असल्याचा बुरखा घालून माधव देवसरकर हे अशा पद्धतीने महिलांशी अश्लील, विकृत वागून संघटनेत काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे विशेषतः महिला पदाधिकाऱ्यांचे खच्चीकरण करत आहेत. त्यांच्या इभ्रतीसी  खेळताहेत, असा आरोप यावेळी करण्यात आला. माझा यात वैयक्तिक आथवा राजकीय-सामाजिक असा कुठलाही स्वार्थ नसून मागील दीड वर्षांपासून मी त्यांच्यासोबत प्रामाणिकपणे सामाजिक विषयावर काम करत आहे. असे निस्वार्थ काम करत असताना त्यांनी माझ्याशीच नव्हे तर समाजाशीही केलेला हा विश्वासघात आहे. अशा दुतोंडी लोकांचे बुरखे फाडून समाजातील इतर महिलांशी असे वर्तन होऊ नये अशी माफक अपेक्षा असल्याचंही यावेळी तक्रारकर्त्यांनी माध्यमांसमोर स्पष्ट केलं.  


या आरोपांविषयी माधव देवसरकर यांना विचारणा केली असता सदर आरोप हे सरासर खोटे असल्याची आणि राजकीय षडयंत्र करून कुभांड रचले असल्याचं स्पष्टीकरण दिलंय. पण या सर्व घटनांविषयी माधव देवसरकर स्वतः चूक झाल्याची कबुली देत माफी मागत असल्याची ऑडिओ क्लिप मात्र व्हायरल झाली आहे. या विषयी पोलीस प्रशासनाचीही बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला, परंतु सदर प्रकरण हे महिलांविषयीचे असल्याचं सांगून पोलिसांनीही काहीही बोलण्यास तयारी दाखवली नाही. त्यामुळे हे सगळं खरं की खोटं हे मात्र पोलीस तपासाअंती उघड होणार आहे.