सांगली : कार्यकर्त्यांनी पक्ष वाढवण्यासाठी प्रसंगी स्वतःच्या जमिनी विकून राष्ट्रीय समाज पक्षाच्या नावाने कार्यालये स्थापित करावे, असा अजब सल्ला रासप अध्यक्ष महादेव जानकर यांनी दिला आहे. सांगलीत रासप पक्षाच्या जिल्हा आढावा बैठक आणि कार्यकर्ता मेळाव्यात महादेव जानकर बोलत होते.


'आपला पक्ष शून्य आहे. कार्यकर्त्यांनी नाटकं बंद करावीत, दोन दिवसात श्रीमंत व्हायची आमच्या पक्षात कुठलीही योजना नाही. म्हणून कार्यकर्त्यांनी आपल्या जमिनी विकून पक्ष वाढवावा.' अशा कानपिचक्या जानकरांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहे.

त्यासोबतच कार्यकर्त्यांनी आपली औकात आपल्या चौकात तरी दाखवावी, असा टोला देखील महादेव जानकरांनी कार्यकर्त्यांना लगावला. पक्षात जिल्हाध्यक्ष पदासाठी कार्यकर्ते 25 हजार रुपये द्यायला तयार आहेत, अशा वक्तव्याचा त्यांचा व्हिडीओ यापूर्वीही समोर आला होता.

राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना जानकरांनी 2004 साली केली होती. रासप महाराष्ट्रासह आसाम, गुजरात, कर्नाटक या राज्यांमध्ये निवडणूक लढवत असतो. महादेव जानकर हे 2014 च्या लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभे राहिले होते. मात्र त्यांचा पराभव झाला होता. नंतर भाजपने त्यांना विधानपरिषदेवर पाठवून युती सरकारमध्ये पशूसंवर्धन आणि दुग्धविकास हे खातं दिलं आहे.