Pune Crime : काम करताना पाय घसरुन इमारतीच्या डक्टमध्ये (Pune crime) पडून कामगाराचा मृत्यू झाला. सुरक्षेची कोणतीही साधने न वापरल्याने ही घटना घडली आहे. मरिअप्पा मल्लय्या वनकेरी असं मृत्यू झालेल्या कामगाराचं नाव आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी (Pune Police) बिल्डर आणि ठेकेदारावर गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना कोंढव्यातील टिळेकरनगरमधील द्वारिकाधाम सोसायटीतील चालू असलेल्या इमारतीच्या साईटवर सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता घडली. साहेबराव मल्लय्या रामोशी यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी ठेकेदार मुकुंद हनमंतराय रेड्डी आणि बिल्डर राहुल नावंदर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
सकाळी रोजप्रमाणे मरिअप्पा मल्लय्या वनकेरी हे कामावर आले. रोज्या कामाला सुरुवात केली. काम करत असताना त्यांचा पाय घसरला आणि ते डक्टमध्ये पडले. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. बांधकाम सुरु असताना ठेकेदार आणि बिल्डर यांनी साईटवर कामगारांच्या जीविताची कसल्याही प्रकारची काळजी घेतली नाही. बिल्डिंगच्या बाजूने सुरक्षारक्षक नेट बांधले नव्हते. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. ठेकेदारांना वारंवार सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यासाच्या सूचना दिल्या जातात, मात्र ठेकेदारांना अजूनही या गोष्टीचं गांभीर्य लक्षात आलं नसल्याचं चित्र आहे.
यापूर्वी देखील अशीच घटना सिंहगड रोडवरील जयदेव नगर परिसरात घडली होती. त्यावेळी सोळाव्या मजल्यावरुन डक्टमध्ये पडून एका महिला कामगाराचा मृत्यू झाला होता. मीनाकुमारी साहू असे 41 वर्षीय काम करणाऱ्या मृत महिलेचं नाव होतं. त्यावेळी देखील सेफ्टी किट किंवा संरक्षणासाठी कोणतीही सामग्री न पुरवल्यामुळे मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं.
कामगारांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची?
पुण्यात अनेक ठिकाणी मोठमोठ्या इमारती बांधकाम करण्यासाठी राज्याबाहेरुन कामगार आणले जातात. त्यांच्या राहण्याची सोय केली जाते. त्यांना योग्य वेतन मिळत असल्याने अनेक कामगार महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरात येतात. मात्र त्यांच्यासोबत होणाऱ्या अपघातांचं प्रमाण सातत्याने वाढत आहे. त्यामुळे अनेक कामगारांमध्ये खळबळ उडाली आहे. ठेकेदारांकडून त्यांची सगळी सोय करण्यात येते मात्र काम करायच्या ठिकाणी त्यांना सुरक्षा उपकरणं पुरवले जात नाहीत. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी ठेकेदाराची असते मात्र ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे अशा घटनांचं प्रमाण वाढत आहे. या आधीसुद्धा येरवड्यात जाळी पडून कामगाराचा मृत्यू झाला होता. कामगारांच्या जीवाची पर्वा ठेकेदार करत नसल्याचं चित्र अनेकदा बघायला मिळालं आहे. त्यामुळे कामाराच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.