शिर्डी : कोरोना व्हायरसची धास्ती अवघ्या जगाला पडली आहे. तशीच ती धार्मिक तीर्थस्थळांना देखील असून कोरोना व्हायरससारख्या महामारीला रोखण्यासाठी आणि त्या व्हायरसचा शिरकाव शिर्डी नगरीत होऊ नये, यासाठी आज महिलांनी 'साई परिक्रमा' करत साईबाबांना प्रार्थना केली. विशेष म्हणजे शिर्डीच्या सीमेवर रेषा आखून साईंच्या चरणी प्रार्थना केली.


आज जागतिक महिला दिनी जगभरात विविध कार्यक्रम होत आहेत. महिला शक्तीचा सर्वत्र जागर होत आहे. महिलांची ही शक्ती आणि त्यासोबत असलेली भक्ती याचा संयोग साधत शिर्डीतील महिलांनी आज साई परिक्रमा करत साईबाबांना कोरोनासारख्या महामारीचा नायनाट करावा, अशी प्रार्थना केली आहे. सर्व महिलांनी पहाटे 6 वाजता खंडोबा मंदिरापासून साई परिक्रमा काढली. या परिक्रमेत महिला आणि युवतींची संख्या लक्षणीय होती. साई परिक्रमेदरम्यान महिलांनी घरून आणलेले धान्याचे पीठ रस्त्यावर टाकत साईबाबांच नामस्मरण केलं. पीठाची रांगोळी शिर्डीच्या सीमेवर टाकण्यात आली.


शिर्डीत महामारीची साथ आली होती, त्यावेळी साईबाबांनी स्वत: जात्यावर पीठ दळून शिर्डीच्या सीमेवर टाकल्याचं सांगितल जातं. त्याप्रमाणे शिर्डी ग्रामस्थांनी आणि महिलांनी सीमेवर सर्वत्र पीठ टाकलं होतं. शिर्डीच्या आसपासच्या गावात महामारीने लोक मृत्यू पावत असताना शिर्डीत मात्र त्याचा किंचीतही परिणाम झाला नव्हता, असा संदर्भ दिला जातो. साईबाबांवर श्रद्धा ठेवत महिलादिनी शिर्डीकर महिलांनी आपली साईभक्ती प्रकट केली. शिर्डीकर ग्रामस्थ तसेच देश-विदेशातून शिर्डीला येणाऱ्या भाविकांना कोणत्याही रोगाची लागण होऊ नये, अशीच प्रार्थना महिलांनी केली.


कोरोना व्हायरसची धास्ती साई मंदिरालाही सतावत आहे. देश-विदेशातून मोठ्या संख्येने भाविक येत असल्याने मास्क परिधान करण्यासोबत संसर्ग होऊ नये यासाठी विविध सूचनाफलक शिर्डीत लावण्यात आले आहेत. साई मंदिरातील साफसफाई देखील वाढवण्यात आली आहे. तर कर्मचाऱ्यांना देखील विशेष काळजी घेण्यासाठी प्रबोधन करण्यात येत आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊ नये यासाठी विविध उपाययोजना होत असताना साई परिक्रमाच्या माध्यमातून आज महिलादिनी महिलांनी साईबाबांना कोरोनाची इडा पिडा टळो असं साकड घातलं आहे.