कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील बऱ्याच दिवसांपासून सतर्कता, निर्बंध आणि सावधगिरीला प्राधान्य देण्यात आलं. बहुतांश ठिकाणी याच निकषांच्या बळावर कोरोनावर काही अंशी नियंत्रण मिळवणं शक्यही झालं. पण, ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या प्रकाराची माहिती मिळाली आणि इथं भारतासह महाराष्ट्रातही चिंतेच्या वातावरणात भर पडली.
काही दिवसांपूर्वीच नागपूरमध्ये इंग्लंडच्या प्रवासाची पार्श्वभूमी असेल्या तरुणाला कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर आली होती. आता त्यातच भीतीच्या वातावरणात आखी भर पडली आहे. कारण इंग्लंडहून आलेली एक महिला कोरोना पॉझिटीव्ह असल्याची माहिती उघड झाली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर औरंगबाद जिल्ह्यात इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांवर जिल्हा प्रशासन विशेष लक्ष ठेवून आहे. 25 नोव्हेंबरपासून शहरामध्ये 44 नागरिक इंग्लंडहून प्रवास करून आलेले आहेत. या सर्वांची यादी शासनाने जिल्हा प्रशासनाकडे पाठवलेली आहे. या सर्व प्रवाशांचा पालिका प्रशासन शोध घेत असून त्यांच्या RTPCR चाचण्या करत आहे. याबाबत शासनाने दिलेल्या निर्देशानुसार शुक्रवारी झालेल्या District Task Force च्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला.
25 नोव्हेंबरपासून आलेल्या 44 प्रवाशांपैकी 11 जणांची RTPCR चाचणी करण्यात आली असून यामध्ये एक महिला पॉझिटीव्ह आढळली आहे. ह्या महिलेमध्ये कोणतीही लक्षणं आढळून आलेली नाहीत. सध्या तिची प्रकृती स्थिर असून, तिच्यावर सेठ नंदलाल धुत हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या महिलेला पूर्वीपासून कोविडची लागण झालेली होती की, शहरात आल्यावर लागण झाली याबाबत; तसंच तिच्यात आढळलेला विषाणू हा नेहमीचा आहे की नवीन स्ट्रेनमधील आहे याबाबत संशोधन करण्यासाठी सदर महिलेचा स्वॅब पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे (National Institute Of Virology) पाठविला असल्याचे मनपाच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले आहे.
इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांमधील पॉझिटीव्ह निघणाऱ्या प्रवाशांना कोविड सेंटर अथवा DCC मध्ये न ठेवता त्यांची सेठ नंदलाल धुत हॉस्पिटल मध्ये विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच निगेटिव्ह येणाऱ्या प्रवाशांना आणि संशयितांना विलगीकरणासाठी शहरातील The ONE या हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे.
जे प्रवासी मागच्या काही दिवसांपूर्वी इंग्लंडहून प्रवास करून आलेले आहेत त्यांनी स्वतःहून जिल्हा प्रशासन तसेच महापालिका प्रशासनाने कळवावे आणि त्यांनी स्वतःची RTPCR टेस्ट करून घ्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले आहे.