पुणे : हेल्मेट न घातल्याबद्दल रिक्षाचालकांकडून 500 रुपये दंड वसूल करण्याची किमया पुणे वाहतूक पोलिसांनी करून दाखवली आहे. तर एका रिक्षाचालकाला ट्रिपल सीट बसवल्यामुळे दंड ठोठावण्याचा अजब प्रकार पुण्यात घडला आहे.


हेल्मेट न घातल्याचा दंड भरलेला रिक्षाचालक भीतीपोटी चक्क हेल्मेट घालूनच रिक्षा चालवताना दिसत आहे. त्यामुळे अनेक लोक या रिक्षावाल्याला पाहून हसतायेत. मात्र हा रिक्षाचालक त्यांना हेल्मेट सक्तीचे 500 रुपये भरलेली दंडाची पावती दाखवतो. तर दुसरीकडे एका रिक्षाचालकाला रिक्षात तीन जण बसवल्याचा ठपका ठेवत त्याच्याकडून दंड आकारण्यात आला आहे.

पुणे शहरात 1 जानेवारीपासून दुचाकीचालकांना हेल्मेटसक्ती लागू झाली असून कारवाई तीव्र करण्यात आली आहे. त्याला शहरातून विरोध होत असतानाच वाहतूक पोलिसांचा हा कारभार पुढे आला आहे. याबाबत रिक्षाचालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

पुणे शहरात दररोज आठ ते दहा हजार लोकांवर हेल्मेट न घातल्याची कारवाई केली जात आहे. अनेक संघटना आणि पुणेकर या हेल्मेट सक्तीला विरोध करत आहेत. यामध्ये वाहतूक शाखेचा हा एक नवीन गोंधळ समोर आला आहे.