सातारा : आज साताऱ्यातल्या पालीमध्ये खंडेराया आणि म्हाळसा देवीचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. सांगली, पुणे, कोल्हापूर, सोलापूर,रत्नागिरीसह कर्नाटक आणि आंध्रप्रदेशातून मोठ्या प्रमाणात भाविक या विवाह सोहळ्याला उपस्थित होते. भंडाऱ्याची अखंड उधळण करत देवाचं लग्न मोठ्या उत्साहात पार पडलं.
आज भंडाऱ्याच्या उधळणीमुळे संपूर्ण पाली पिवळ्या, सोनेरी रंगात रंगली आहे. सुरुवातीला खंडोबा आणि म्हाळसादेवी यांच्या मूर्ती मंदिरातून वाजत गाजत पालखीतून बाहेर काढण्यात आल्या. मूर्ती रथामध्ये ठेवून नगरप्रदक्षिणा काढण्यात आली. नगरप्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर गोरज मुहूर्तावर खंडोबा आणि म्हाळसादेवी यांचं लग्न लागलं.
पालीच्या खंडोबा आणि म्हाळसादेवीच्या विवाह सोहळ्यात बारा बलुतेदारांना मान असतात. असे म्हटले जाते की, छत्रपती शिवाजी महाराजांनी पालीच्या खंडोबाचं दर्शन घेऊन ही प्रथा सुरू केली.
असा असतो विवाह सोहळ्यातला मानपान
खंडेरायाच्या पालखीचा मान पाटील कुटुंबाकडे असतो. सोबत देशपांडे आणि कुलकर्णीदेखील असतात. देवाच्या पालखीच्या छत्रीचा मान माळी समाजाकडे असतो. विवाह सोहळ्यामध्ये आरसे पकडण्याचा मान नाभिक समाजाकडे असतो. भोई समाजाकडे देवाची पालखी उचलण्याचा मान आहे. इतर समाजातील लोकांकडेदेखील विवाह सोहळ्यातले विविध मान आहेत.
असा असतो विवाह सोहळा
सर्वप्रथम खंडोबा आणि म्हाळसादेवी यांच्या मूर्ती मंदिरातून वाजत-गाजत पालखीतून बाहेर काढल्या जातात. त्यानंतर त्या मूर्ती रथामध्ये ठेवल्या जातात. या रथाची नगरप्रदक्षिणा केली जाते. नगरप्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर गोरज मुहूर्तावर खंडोबा आणि म्हाळसादेवी यांचं लग्न लावलं जातं.
महाराष्ट्रासह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून मोठ्या प्रमाणात भाविक या विवाह सोहळ्याला येतात. भंडाऱ्याची अखंड उधळण केली जाते. उंचच उंच कावड (सासनकाठी)नाचवल्या जातात. वेगवेगळ्या गावांहून लोक कावडी (सासनकाठ्या) घेऊन देवाच्या लग्नाला येत असतात. देवाच्या लग्नाच्या वेळी पालीतल्या तारळी नदीचा काठ गर्दीने फुलून जातो.
पालीत खंडोबाची यात्रा, खंडेराया आणि म्हाळसाचं लग्न
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Jan 2019 05:45 PM (IST)
आज साताऱ्यातल्या पालीमध्ये खंडेराया आणि म्हाळसा देवीचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. सांगली, पुणे, कोल्हापूर, सोलापूर,रत्नागिरीसह कर्नाटक आणि आंध्रप्रदेशातून मोठ्या प्रमाणात भाविक या विवाह सोहळ्याला उपस्थित होते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -