नागपूर:  हिवाळी अधिवेशनाला (Winter Assembly Session)  गुरूवारपासून सुरूवात होत आहे. मात्र नागपूरमध्ये (Nagpur News)  होणाऱ्या या अधिवेशनात यावेळी मुंबईवरून राडा होण्याची दाट चिन्ह आहेत. एकीकडे ठाकरेंकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)  यांच्यावर आरोप होत असतानाच आता ठाकरे गटाला भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर अडचणीत आणण्याची रणनिती सरकारने आखली. अधिवेशन नागपुरात होणार पण चर्चा रंगणार आहे ती मुंबईची...  


हिवाळी अधिवेशनात ठाकरे आणि शिंदेमध्ये मुंबईच्या विविध प्रश्नांवरून झुंपणार आहे. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर हिवाळी अधिवेशन अनेकदा गाजल्याचेही आपण अनेकदा पाहिले आहे. विदर्भातल्या प्रश्नांवर गदारोळ होतो पण मुंबईतल्या काही घोटाळ्यांसंदर्भात आता फास आवळणार आहेत .  याला कारण ठरले आहे उद्धव ठाकरेंची परिषद... मुंबईत मंगळवारी शिवालय येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुंबईच्या निवडणुका आणि कंत्राटदारावरुन एकनाथ शिंदेना भाजपला डिवचले आहे. आता उद्धव ठाकरेंनी टीका केल्यानंतर सत्ताधारी तरी कसे शांत बसणार आहेत.


ठाकरेंचा वार आणि आता शिंदेंचा पलटवार


सत्ताधाऱ्यांनी तर या अधिवेशनात उद्धव ठाकरेंच्या काळातील घोटाळ्याची यादीच बाहेर काढण्याची तयारी केली आहे. कोरोना काळातील घोटाळे , रस्ते घोटाळे , नाले सफाई घोटाळे किंवा खिचडी घोटाळ्यांवरून ठाकरे गटावर झालेले आरोप  या सर्वांची चौकशी लावण्याच्या तयारीत  सत्ताधारी दिसत आहे. उद्धव ठाकरे गटाचे सैनिकही या चौकशीला तयार आहेत. या अधिवेशनात दुध का दुध पानी का पानी होऊ जाऊ द्या असं आव्हान सुनिल प्रभू यांनी केलंय.


मुंबईच्या मुद्यावर राजकीय वातावरण तापणार


 तीन राज्यात घवघवीत यश मिळाल्यानंतर भाजप अधिकच आक्रमक झाले आहे.  मुंबई आमचीच म्हणत ठाकरेंना भाजपने डिवचल आहे. त्यात आता ऐन नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मुंबई महापालिकेतील घोटाळ्याच्या मुद्दयावर ठाकरेंना भाजप आणि शिवसेना अडचणीत आणण्याची आणण्याची रणनीती आखत आहे. त्यामुळे नागपूरच्या थंडीत मुंबईच्या मुद्यावर राजकीय वातावरण तापणार आहे.


शिंदे सरकारची विशेष तयारी


हिवाळी अधिवेशनात यावेळी सभागृहात चर्चा घडवून आणण्यासाठी सरकारी पक्ष आग्रही असून मोठया घोषणा ही केल्या जाणार आहे. यासाठी सर्व समाजासाठी काय योजना दिल्या आणि भविष्यात काय करता येतील यासंदर्भात अभ्यास करण्यासाठी सर्व विभागांना सूचना देण्यात आल्या आहेत.  तसंच अनेक समाजाच्या शिष्टमंडळांनी ज्या ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या सोडवणं शक्य आहे का याचाही अभ्यास करण्यासाठी विभागांना सूचना देण्यात आल्या आहेत. मराठा समाजाला झुकतं माप दिल्यावर इतर समाजावर अन्याय झाल्याची भावना निर्माण होऊ नये म्हणून सरकारने सावध पवित्रा घेतला आहे. 


हे ही वाचा :


Winter Assembly Session: हिवाळ्यात पावसाळा,अधिवेशनातही घोषणांचा पाऊस, आंदोलनं आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे सरकारची विशेष तयारी