Deepak Kesarkar : ऑलिम्पिकमध्ये उत्तम कामगिरी करणारे अधिकाधिक खेळाडू कोल्हापूरच्या मातीत घडायला हवेत. यासाठी क्रीडा मंत्र्यांसोबत लवकरच बैठक घेवून जिल्ह्यातील खेळाडूंना दर्जेदार सुविधा देण्याच्या दृष्टीने जिल्ह्याच्या 'विशेष क्रीडा पॅकेज' साठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज दिली.


कोल्हापूर जिल्ह्याच्या पर्यटन विकासाच्या दृष्टीने आज पालकमंत्री दीपक केसरकर यांनी शहरातील विविध ठिकाणांना भेटी देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी पंचगंगा घाट परिसराची पाहणी करुन महानगरपालिका आयुक्त डॉ कादंबरी बलकवडे यांच्याकडून या परिसराच्या सुशोभीकरण आराखड्याबद्दल चर्चा केली. यानंतर शाहू तालीम, मोतीबाग तालीम, न्यू मोतीबाग तालीमला भेट देऊन कुस्तीपटू व प्रशिक्षकांसोबत संवाद साधला. यावेळी पालकमंत्र्यांनी कुस्ती प्रशिक्षकांना दरमहा 10 हजार रुपयांचे मानधन वैयक्तिक स्वरुपात देत असल्याचे घोषित केले.


पालकमंत्री केसरकर म्हणाले, शाहू महाराजांनी कुस्तीला राजाश्रय दिला. कोल्हापूरला खेळाचा वारसा आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत खाशाबा जाधवांनी कुस्ती मध्ये पहिलं पदक आपल्या देशाला मिळवून दिलं. भविष्यात देशाला ऑलिंपिक मध्ये अधिकाधिक सुवर्णपदके मिळवून देण्यासाठीचे खेळाडू कोल्हापूरच्या मातीत घडण्यासाठी आवश्यक त्या सर्व सेवा सुविधा देण्यात येतील, असे सांगितले. तसेच तालमींना मॅट व व्यायामाचे साहित्य तसेच मूलभूत सुविधा तातडीने पुरवाव्यात. तसेच कोल्हापुरातील सर्व तालमींची लवकरात लवकर दुरुस्ती करुन घ्यावी, अशा सूचना क्रीडा विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या.


कुस्ती ही आपली परंपरा आहे. शाहू महाराजांनी तालमी बांधल्यामुळे अनेक मल्ल घडले. शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा जोपासत खाशाबा जाधव, गणपतराव आंदळकर यांच्यासारखे मल्ल कोल्हापूरात तयार होण्यासाठी प्रयत्न करुया.  यासाठी पहिल्या टप्प्यात निवडक 4 ते 5 तालमी सर्व सोयीसुविधांनी परिपूर्ण करण्यात येतील. यानंतर टप्प्याटप्प्याने सर्व तालमींना आवश्यक सुविधा देण्यात येतील, असे पालकमंत्री श्री. केसरकर यांनी सांगितले.


केसरकर यांनी अंबाबाई मंदिर परिसराची पाहणी करुन अंबाबाई विकास आराखड्याबद्दल पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार व सचिव शिवराज नाईकवाडे यांच्याकडून माहिती घेतली. भाविकांना आवश्यक त्या सुविधा मिळवून देण्यासाठी गतीने कार्यवाही होण्याबाबत चर्चा केली. यावेळी त्यांनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी शाहू मिलला भेट देवून येथील परिसराची पाहणी केली. येथील शाहू स्मारक संदर्भातील उत्कृष्ट आराखड्याचा विचार करुन तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली त्याची अंमलबजावणी करण्यात येईल, असे केसरकर यांनी सांगितले.


इतर महत्वाच्या बातम्या