बीड शहरात आज ऊसतोड कामगारांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी अग्रक्रमाने ऊसतोड कामगारांच्या मागण्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे, ऊसतोड कामगारांसाठी तयार करण्यात आलेले गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळ दसऱ्यापर्यंत सुरु करणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी या वेळी सांगितले.
ऊसतोड कामगारांच्या मागण्या काय आहेत?
- ऊसतोड कामगारांची मजुरी दुप्पट करावी
- मुकादमाने कमिशन 35 टक्क्यापर्यंत करावं
- ऊसतोड कामगारांचा विमा उतारावा आणि त्या विम्याची रक्कम साखर कारखानदारांनी द्यावी
- साखर कारखान्याच्या साईटवरती पुस्तक कामगार आणि मुकादमांना पक्की घरं बांधून देण्यात यावी
ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांसाठी लवाद नेमण्यात आले आहे, त्यात पंकजा मुंडेही आहेत. त्यामुळे पंकजा मुंडेची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जातेय. म्हणूनच येत्या चार तारखेला होणाऱ्या साखर संघाच्या बैठकीमध्ये पंकजा मुंडे या ऊसतोड कामगारांचे प्रश्न त्यांच्या समोर मांडणार असल्याने कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
यावर्षीचा दसरा मेळावा सावरगावातच!
भगवान गडावरील दसरा मेळाव्याचा वाद निर्माण झाल्यानंतर मागच्या वर्षी पंकजा मुंडे यांनी भगवान बाबांच्या जन्मगावी म्हणजे सावरगावमध्ये दसरा मेळावा घेतला होता. यावर्षी सुद्धा हा दसरा मेळावा भगवानबाबांच्या जन्मगावी म्हणजे सावरगावात होणार आहे, अशी घोषणा आज पंकजा मुंडे यांनी या मेळाव्यात केली.