मुंबई : फेब्रुवारी महिन्यात हिंदुत्वाच्या मुद्यावर भडकावू भाषण दिल्याप्रकरणी दाखल याचिकेची मुंबई हायकोर्टाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. भाजप आमदार नितेश राणे आणि गीता जैन यांच्यावर कारवाई करणार का? अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने केली आहे. या संदर्भात मुंबई आणि ठाणे पोलीस आयुक्तांना आठवडाभरात उत्तर सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पुढील सोमवारी या प्रकरणी पुन्हा सुनावणी होणार आहे. त्यामुळे भाजप नेत्यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत. 


मीरा रोड आणि मुंबईतील काही नागरिकांनी भाजप आमदार नितेश राणे आणि गीता जैन यांच्या भडकावू भाषणांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात फौजदारी रिट याचिका दाखल केली आहे. भाजप नेत्यांवर कारवाई करण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. जानेवारी महिन्यात झालेल्या हिंसाचारातील दोन पीडितांसह पाच याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतरही पोलीस स्वत:हून गुन्हे नोंदविण्यात अयशस्वी ठरल्याचे सांग न्यायालयात धाव घेतली आहे. 


याचिकाकर्त्यांचा दावा आहे की संघर्ष सुरू असताना राणे यांनी स्थानिक आमदार जैन यांच्यासह मीरा रोडच्या काही भागांना भेट दिली आणि त्यांच्या भाषणातून अल्पसंख्याक समुदायाच्या सदस्यांना धमकावले. राणे यांनी गोवंडी आणि मालवणीसह इतर उपनगरांनाही भेट दिली आणि अधिक द्वेषपूर्ण भाषणे दिली, असे याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे.


21 जानेवारीला हिंसाचार झाला होता


अयोध्या राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा होण्याच्या एक दिवस आधी मीरा रोड मात्र जातीय तणावामुळे चर्चेत आला. मीरा रोडच्या नया नगर भागात राम मंदिर शोभा यात्रा काढणाऱ्या लोकांवर हल्ला करण्यात आला. यानंतर परिसरात तणाव पसरला. पोलिसांनी 19 जणांना अटक केली होती. 23 जानेवारी रोजी बेकायदा बांधकामांवर स्थानिक पालिकेकडून बुलडोझरची कारवाईही करण्यात आली होती. पोलिसांनी कारवाई केली तेव्हा एआयएमआयएमसह इतर संघटनांनी एकतर्फी कारवाईचा आरोप केला होता. 


इतर महत्वाच्या बातम्या