नवी दिल्ली : नारायण राणेंच्या पुनर्वसनाबद्दल काल राजधानी दिल्लीत जी बैठक पार पडली, त्यात नारायण राणेंचे पुत्र आणि काँग्रेस आमदार नितेश राणे यांची उपस्थिती आश्चर्यजनक होती.

11 अकबर रोड या भाजपाध्यक्ष अमित शहांच्या निवासस्थानी काल मध्यरात्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नारायण राणे यांच्यात चर्चा झाली. या बैठकीला काँग्रेसचे आमदार नितेश राणे, भाजपचे आशिष शेलारही उपस्थित होते.

नारायण राणेंनी काँग्रेस सोडताना आपल्या विधानपरिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे. पण नितेश राणे हे अजूनही काँग्रेसचे आमदार आहेत. त्यामुळे त्यांनी थेट भाजपाध्यक्षांच्या निवासस्थानी होणाऱ्या अशा गुप्त बैठकीला हजेरी लावणं याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. काँग्रेस पक्ष हे खपवून घेणार का?, पक्षाच्या शिस्तीबाहेरचं हे वागणं नाही का? असे सवाल उपस्थित होत आहेत.

याबद्दल काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश यांच्याशी एबीपी माझानं फोनवर चर्चा केली असता, 'नितेश हे आपलं पुत्र कर्तव्य निभावत असावेत. पण त्यांची अवस्था ही त्यांच्या पित्याप्रमाणेच झाली आहे. आपण नेमके कुठे आहोत, भाजपसोबत आहोत की नाहीत या संभ्रमावस्थेत ते असावेत.' अशी खोचक प्रतिक्रिया त्यांनी दिली.

त्यांच्या या वर्तणुकीबद्दल पक्ष काही पाऊल उचलणार का? असं विचारलं असता त्यांनी ही बाब पक्ष गंभीरतेनं घेत नसल्याचं सांगितलं. अर्थात नितेश राणेंचं हे वागणं खपवून घेण्यामागे काँग्रेसला आपलं विधानसभेतलं विरोधी पक्षनेतेपद गमावण्याची भीती वाटत असावी. कारण काँग्रेसचा एक आमदार कमी झाल्यास विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादीकडे जाऊ शकतं.

संंबंधित बातम्या :

नारायण राणे भाजपची खासदारकीची ऑफर मान्य करतील?

दिल्लीत राणे-फडणवीस एकत्र, मंत्रिपदावर निर्णयाची शक्यता

दिल्लीत अमित शाह, मुख्यमंत्री आणि राणेंची बैठक, मंत्रिपदावर खलबतं?