मुंबई : संभाजी ब्रिगेडला निवडणुकीसाठी युती करण्यासाठी भाजप हाच पर्याय असल्याच संभाजी ब्रिगेडचे प्रमुख पुरुषोत्तम खेडेकर यांनी म्हटलय.  मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडच्या राजकीय आघाडीकडून प्रकाशीत होणाऱ्या मराठा मार्ग या मासिकात लेख लिहून पुरुषोत्तम खेडेकर यांनी त्यांची ही भूमिका मांडली आहे. खेडेकरांच्या या ऑफरवर सावध पवित्रा घेत भाजपने खेडेकर यांच्याकडून प्रस्ताव आल्यावर कोअर कमिटीत चर्चा करून निर्णय घेऊ असं म्हटलंय . त्यामुळं महाराष्ट्रात एका नव्या युतीची चर्चा सुरु झाली.


युतीसाठी भाजप हाच उत्तम पर्याय; संभाजी ब्रिगेडचे प्रमुख पुरुषोत्तम खेडेकर यांची भूमिका


संभाजी  ब्रिगेड स्थापन होऊन 32 वर्ष झाल्यानंतर देखील अपेक्षित यश न मिळाल्याने संभाजी ब्रिगेडने आता निवडणुकीच्या राजकारणात उतरायचं ठरवलंय. राजकारणाची सुरुवात करताना युतीसाठी निवड केलीय ती भारतीय जनता पक्षाची . संभाजी ब्रिगेड आणि भारतीय जनता पक्ष आणि पक्षाची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या सामाजिक विषयांवरच्या भूमिका एकमेकांच्या संपूर्णपणे विरोधी राहिल्या आहे. असं असताना संभाजी ब्रिगेडने भाजपसमोर युती करण्याचा प्रस्ताव ठेवल्याने आश्चर्य व्यक्त होतंय . या प्रस्तवाचं समर्थन करताना पुरुषोत्तम खेडेकरांनी राजकारणात कोणीच कोणाचा शत्रू नसतो आणि सत्ता हस्तगत करण्यासाठी सर्व काही करावं लागतंय असं म्हटलंय . 


 खेडेकरांच्या या प्रस्तवाबद्दल आश्चर्य व्यक्त होत असलं तरी खेडेकरांचा भाजपसोबत जुना घरोबा आहे.  पुरोषोत्तम खेडेकरांच्या पत्नी रेखा खेडेकर या भारतीय जनता पक्षाकडून बुलढाणा जिल्ह्यातील चिखली मतदारसंघातून तीनवेळा आमदार राहिल्यात. 2014 ला त्यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभेची निवडणुकही लढवली . पुरुषोत्तम खेडेकरांनी जरी भाजपसोबत युती करण्याची तयारी दाखवली असली तरी पण मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार असल्याचं रेखा खेडेकर यांनी म्हटलंय . खेडेकरांच्या भूमिकांमध्ये हा विरोधाभास सुरुवातीपासूनच राहिलाय . एकीकडे संघाच्या विचारधारेवर टीका करताना  पुरुषोत्तम खेडेकरांचे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी नेहमीच जवळकीचे संबंध राहिलेत. देवेंद्र फडणवीस असतील  किंवा नितीन गडकरी पुरुषोत्तम खेडेकरांसोबत संभाजी ब्रिगेडच्या कार्यक्रमांना त्यांनी अनेकदा हजेरी लावलीय . त्यामुळं पुरुषोत्तम खेडेकरांकडून युतीचा प्रस्ताव आल्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावर विचार करून निर्णय घेऊ असं म्हटलंय. 



 


राजकारणात कोणीच कोणाचा कायमस्वरूपी मित्र किंवा शत्रू नसतो आणि म्हणूनच राजकारणात काहीही होऊ शकतं असं म्हटलं जातं . पण इथं प्रश्न फक्त भाजपच्या राजकारणाचा नाही तर भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परवानगीचाही आहे . पुरोषोत्तम खेडेकरांनाही याची पुरेपूर कल्पना आहे . तरीही त्यांनी भाजपला युतीचा प्रस्ताव दिल्याने त्यांचा हा  चर्चेत राहण्यासाठीचा प्रयत्न आहे का असाही प्रश्न विचारला जातोय