Sangli News: सांगली जिल्ह्यात बांधकाम कामगार महामंडळाच्या (Sangli construction workers welfare ) योजनांमध्ये काही एजंट लोकांकडून लाभार्थीचा निधी हडप करण्याचा प्रकार समोर येत आहे. कामगारांच्या या योजनांमध्ये त्यामुळे मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने (swabhimani shetkari sanghatana) बांधकाम कामगार मंडळाकडे कागदपत्रे आणि अन्य पुराव्यांसह तक्रार केली आहे. मृत झालेल्या बांधकाम कामगाराच्या पत्नीच्या खात्यावर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या योजनेतून दोन लाखांचे अनुदान वर्ग होते, मात्र अवघ्या अर्ध्या तासातच दलालाच्या खात्यावर त्यातील निम्मे पैसे निघून जातात, अशा पद्धतीने  बांधकाम कामगार महामंडळाच्या योजनांमध्ये अनेक घोटाळे झाले असल्याचे आरोप होत आहेत. जिल्हाभर अशा एजंट लोकांची ही साखळी कार्यरत असल्याचे दिसते आहे. कामगारमंत्र्यांच्या जिल्ह्यातच कामगार महामंडळाच्या योजनांच्या माध्यमातून लाभार्थीचा निधी हडप करण्याचे प्रकार होत असल्याचा आरोप करण्यात येत असल्याने सध्या सांगलीतील बांधकाम कामगार महामंडळाचा कारभार वादाच्या भोवऱ्यात सापडलाय.


घटना काय?


मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणे, ही म्हण तुम्ही ऐकली असेल, पण या म्हणीचा प्रत्यय सांगलीत बांधकाम कामगाराच्या कुटुंबाना आला आहे. वाळवा तालुक्यातील तांबवे गावच्या नोंदणीकृत बांधकाम कामगार असलेल्या महादेव निप्रुळ यांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले. महादेव यांच्यां पश्चात त्याच्या पत्नी लक्ष्मी निप्रुळ यांना एका एजंटने गाठले. बांधकाम कामगाराच्या निधनानंतर मिळणाऱ्या अनुदानासाठी प्रस्ताव तयार करुन देतो, म्हणत एजंटने या कुटुंबीयांना गळ घालत त्यांना पैसे मिळवून देण्याची ग्वाही दिली. कुटुंबीयांनी या एजंटवर विश्वास ठेवत सर्व कागदांवर सह्या केल्या. दोन वर्षांनंतर हे अनुदान अखेर मृत बांधकाम कामगाराच्या विधवा पत्नी म्हणून लक्ष्मी निप्रुळ यांच्या खात्यावर जमाही झाले. मात्र  दोन लाख रुपये मधील एक लाख रुपये आम्हाला द्यावे लागतील, असे या कुटूंबाला धमकावत सलीम नावाच्या एजंटने जबरदस्तीने खात्यातील एक लाख रुपये काढून घेतले, असा आरोप या कुटुंबाकडून करण्यात येत आहे.  


निप्रुळ कुटुंबाबत झाले तेच तांबवे गावातीलच नवगीरे कुटूंबाच्या बाबतीत घडले. एजंट सलीम सय्यदने या कुटुंबाला देखील पैसे मिळवून देतो, असे म्हणत कागदपत्रे घेतली आणि 2 लाख  जमा झाल्यानंतर त्यातील एक लाख द्या, असे धमकावून काढून घेतल्याचे नंदा नवगिरे या मृत बांधकाम कामगार पत्नीने सांगितले. तांबवे गावातील अनेक कामगार कुटूंबाना, अशा पद्धतीने पैसे मिळवून देतो असे म्हणत एजंट लोकांनी गळ घातली आणि मिळालेल्या अनुदानातील  निम्मी रक्कम या सलीम एजंटांने हडप केली. अशा या सगळ्या प्रकारची चौकशी व्हावी, अशी मागणी आता नागरिक करत आहेत.