Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद पुन्हा स्वीकारण्याचा निर्णय शरद पवार (Sharad Pawar) यांनी जाहीर आज भरगच्च पत्रकार परिषदेत जाहीर केला. शरद पवार यांच्या या घोषणेनंतर मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर पडदा पडला. शरद पवार यांनी राजकीय आत्मचरित्र 'लोक माझे सांगती' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात अध्यक्षपदाचा राजीनामा देत निवृत्ती स्वीकारण्याची घोषणा केली होती. त्यावेळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात मोठा गदारोळ झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हा निर्णय मागे घेण्याची विनंती शरद पवार यांना केली. त्यानंतर मागील तीन-चार दिवस नाट्यमय घडामोडी घडत होत्या. अखेर पवार यांच्या पत्रकार परिषदेनंतर पवार यांनी आपला निर्णय मागे घेतला.
शरद पवार हे कोणताही निर्णय घेताना मोठा विचार करतात. अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय देखील त्यांनी मोठ्या विचारानंतर घेतला होता. मात्र, त्यांना आपला निर्णय मागे घ्यावा लागल्याने मोठी चर्चा रंगली आहे.
या पाच कारणांनी राजीनामा मागे घेतला?
तरुण कार्यकर्त्यांचं सलग आंदोलन: शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून राजीनामा देत निवृत्त होण्याची घोषणा केल्यानंतर कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनात तरुण कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग होता. राजीनाम्याचा पुनर्विचार करण्यासाठी कार्यकर्त्यांकडून पवारांवर दबाव निर्माण करण्यात आला होता. महाराष्ट्रासह देशातील इतर राज्यातील राष्ट्रवादीच्या तरुण नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी पवारांना निर्णय मागे घेण्याची विनंती केली होती.
- ज्येष्ठ नेत्यांचा भावनिक दबाव: शरद पवारांच्या निर्णयानंतर पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी नाराजी व्यक्त करत निर्णय मागे घेण्याची विनंती पवारांना केली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून सोबत असलेल्या नेत्यांचा समावेश होता. छगन भुजबळ, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाडापासून अनेक नेत्यांचा समावेश यामध्ये होता. अनेकांना भावना अनावर झाल्या नव्हत्या. राष्ट्रवादी काँग्रेसची पडझड होत असताना पक्षाला साथ देणाऱ्या नेत्यांकडून पवारांना निवृत्तीचा निर्णय मागे घेण्यास सांगितले.
- देशभरातील विरोधी पक्षाच्या बड्या नेत्यांची विनंती: शरद पवार यांनी निवृत्तीचा निर्णय घेतल्यानंतर फक्त राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ उडाली नाही. तर, देशातील इतर पक्षांनीदेखील याची दखल घेतली. काँग्रेस नेते राहुल गांधी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन आदींनी सुप्रिया सुळे यांच्याशी संपर्क साधून पवारांनी निर्णय मागे घ्यावा अशी विनंती केली. राज्यातील आणि देशातील इतर नेत्यांनीदेखील पवारांना विनंती केली होती.
- आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी कार्यकर्त्यांचं मनोबल खच्ची होऊ न देणं: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आता फक्त वर्षभराचाच कालावधी उरला आहे. आगामी 2024 ची लोकसभा निवडणूक महत्त्वाची असणार आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून अधिकाधिक जागा जिंकण्याचे उद्दिष्ट विरोधकांचे असणार आहे. काही सर्वेनुसार, राज्यातील 48 जागांपैकी जवळपास 30 हून अधिक जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होऊ शकतात. त्यामुळे आगामी निवडणुकीपूर्वी कार्यकर्त्यांच्या मनोबल खच्ची होऊ न देण्यासाठी पवारांनी निवृत्तीचा निर्णय मागे घेतला असावा, अशी चर्चा आहे.
- विरोधी पक्षांची एकजूट कायम राहावी: भाजपच्या आक्रमक पावित्र्यामुळे देशभरातील विरोधी पक्ष हतबल अवस्थेत होता. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा प्रयोग झाल्यानंतर देशातील भाजपविरोधी पक्ष, आघाडीत नवा उत्साह संचारला. भाजपचा मुकाबला करण्यासाठी विरोधकांची एकजूट कायम ठेवण्याचे आव्हान आहे. अशा वेळी शरद पवार हे मोठी आणि निर्णायक भूमिका बजावू शकतात. शरद पवार यांचे संबंध सगळ्याच राजकीय पक्षात उत्तम असल्याने विरोधकांच्या आघाडीत त्यांचे स्थान महत्त्वाचे आहे.
- उत्तराधिकारी निवडण्याचे संकेत: शरद पवार यांनी आपला राजीनामा मागे घेताना काही महत्त्वाचे संकेत दिले. आपण पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी घेत असल्याचे सांगत त्यांनी कोणतंही जबाबदारीचं पद घेणार नाही असे स्पष्ट केले. त्याच वेळी त्यांनी पक्षात आता उत्तराधिकारी निर्माण झाला पाहिजे असेही प्रतिपादन केले. पक्षात नवं नेतृत्त्व निर्माण होईल यासाठी काही संघटनात्मक बदल मी करणार आहे असेही त्यांनी म्हटले. पक्षात नवं नेतृत्व निर्माण होईल, यासाठी काही संघटनात्मक बदल करणार असल्याचे शरद पवारांनी स्पष्ट केले.