बीड : कोरोनाचे संकट दिवसेंदिवस अधिक तीव्र होत असतानाच राज्य सरकारने 15 टक्के कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील वाहतूक अद्याप सुरू झालेली नाही. आजही अनेक ठिकाणी लॉकडाऊन केले जात आहे. त्या काळामध्ये बदल्या केलेल्या कर्मचाऱ्यांनी करायचे कसे? असा प्रश्न भाजपचे विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांनी उपस्थित केला आहे.
कोरोनाच्या संकट काळात 4 मे रोजी राज्य सरकारकडून हे जाहीर करण्यात आलं होतं की 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2021 या आर्थिक वर्षामध्ये राज्यभरात कोणत्याही कर्मचाऱ्यांच्या बदल्या या धोरणाच्या पार्श्वभूमीवर होणार नाहीत. विशेष म्हणजे अनेक खर्चाला कात्री लावण्याचे निर्णय या काळात सरकारने केले. त्याचाच एक भाग म्हणून राज्यभरातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांवरती निर्बंध आणले होते. त्यानंतर मुंबईमधल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे प्रकरण चांगलेच गाजले. याच बदल्यांवरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमधील नेत्यांमध्ये चर्चाही रंगल्या होत्या.
या बदली प्रकरणानंतर सरकारकडून 7 जुलैला पुन्हा एक नवीन शासन निर्णय काढण्यात आला. ज्यात राज्यभरातील प्रत्येक संवर्गातील 15 टक्के अधिकारी आणि 15 टक्के कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. विशेष म्हणजे या बदल्या करण्याचे अधिकार हे सक्षम अधिकाऱ्यांना देण्यात आले होते. विशेष म्हणजे या बदल्या निश्चित करण्याची मुदतही 31 जुलै 2020 ही जाहीर सुद्धा करण्यात आली होती.
मात्र त्यानंतर 23 जुलै रोजी पुन्हा एक नवीन आदेश काढण्यात आला, ज्यानुसार बदल्या करण्याची मुदत ही 31 जुलैवरून वाढवून ती आता 10 ऑगस्ट करण्यात आली आहे. राज्यातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या या 31 जुलै ऐवजी 10 ऑगस्टपर्यंत करण्याच्या निर्णयाबद्दल अनेक राजकीय चर्चा केल्या जात आहेत.
जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑफलाईन होणाऱ्या बदल्यांवर होतेय टीका.
भाजप-शिवसेना सरकारमध्ये राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या या राज्य पातळीवरून ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत होत्या. त्यानंतर राज्यभरातील वेगवेगळ्या संघटनांनी आघाडीच्या सरकारला निवेदने देऊन बदल्यांबाबत भूमिका घेण्याची विनंती केली होती. त्यानंतर ग्रामविकास विभागाने सुरुवातीला प्राथमिक शिक्षक वगळता इतर सर्व विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश दिले होते.
मात्र त्यानंतर विभागाने प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या ऑफलाईन करण्याचा निर्णय जाहीर केला. आता जर जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या या ऑफलाईन पद्धतीने होणार असतील तर मग तालुका आणि जिल्हास्तरावरच्या कार्यालयांमध्ये गर्दी होणार नाही हे कशावरून? कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती या वर्षीच्या जिल्हांतर्गत बदल्या या सामान्य प्रशासन विभागाच्या 7 जुलै 2020 रोजीच्या शासन निर्णयात नमूद केलेल्या विहित कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने करणे शक्य दिसत नाही. त्यामुळे जिल्हांतर्गत बदल्या सध्या ऑफलाईन पद्धतीने करण्यात येणार असून जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांसाठीची प्रक्रिया यापूर्वी सुरू केली असून त्या अनुषंगाने शिक्षकांची ऑनलाईन अर्ज देखील केलेले आहेत. त्यामुळे आंतरजिल्हा बदल्या या प्रचलित धोरणानुसार ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार असल्याचेही ग्रामविकास विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे..
पण जिल्हाअंतर्गत शिक्षकांच्या बदल्या करायचे ठरले तरी अनेक कर्मचाऱ्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावे लागणार आहे..जिल्हा भरा मधील प्राथमिक शिक्षकांची संख्या बघता हे सध्याच्या वातावरणामध्ये परवडणारे नाही.. या काळात विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देणे सुद्धा दुरापास्त झालाय कोरोना चे रुग्ण रोज वाढत आहेत अशा परिस्थितीमध्ये अशा कर्मचाऱ्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकानि नेने हे परवडणारे नाही असा आरोप सुरेश धस यांनी केलाय..