नाशिक : दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अटकेची फाईल युती सरकारच्या कार्यकाळात तयार झालेली नसेलच, पण एखाद्या विभागाने फाईल समोर आणली, तर त्यावर सही करताना मंत्री म्हणून छगन भुजबळ यांनी आपल्या सदसद विवेकबुद्धीचा वापर करायला नको का, असा सवाल अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी केला.

सुधीर मुनगंटीवार हे आज वृक्षलागवडीचा आढावा घेण्यासाठी नाशिकमध्ये होते. दुपारी त्यांनी वनविभाग अधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली, त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना भुजबळांच्या वक्तव्यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिलं.

बाळासाहेबांच्या अटकेची फाईल ही मी मंत्री होण्याच्या अगोदरच तयार झाली होती, असा गौप्यस्फोट भुजबळांनी एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात बोलताना केला होता. कारण, भुजबळांच्या अगोदर युतीचं सरकार होतं. मग ही फाईल युतीच्याच कार्यकाळात तयार झाली का, असा सवाल भुजबळांच्या वक्तव्यानंतर निर्माण झाला होता.

''युतीच्या काळात अशी कोणतीही फाईल तयार झालेली नाही. एखाद्या विभागाने फाईल तयार केलेली असेल तर कोणत्याही फाईलवर सही करताना भुजबळ यांनी आपल्या सदसद विवेकबुद्धीचा वापर करुन सही करायला हवी होती. युतीच्या काळात अशी फाईल तयार झालेलीच नसेलच. पण कोणत्याही मंत्र्याला आपण डोळे झाकून सही केली, असं म्हणण्याचा अधिकार नाही,'' असं भुजबळ म्हणाले.

माझा कट्टावर भुजबळ काय म्हणाले?

''गृहमंत्री झाल्यानंतर सगळ्या फाईल पुढे गेलेल्या होत्या. मात्र नेमकी बाळासाहेबांच्या अटकेचीच फाईल माझ्यासमोर आली. पोलिसांनी सांगितलं यावर कारवाई करायला पाहिजे. त्यानंतर त्या फाईलवर फक्त सही केली, ती फाईल माझ्या कार्यकाळात तयार झाली नव्हती,'' असं भुजबळ म्हणाले.

काय आहे प्रकरण?

बाबरी मशीद पाडल्यानंतर मुंबईत दंगली उसळल्या होत्या. या दंगलीच्या तपासासाठी जस्टीस श्रीकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना करण्यात आली होती. या आयोगाच्या शिफारशीनुसारच आपण कारवाई केली, असं भुजबळ म्हणाले. एका अग्रलेखाच्या प्रकरणावरुन 2000 साली बाळासाहेबांना अटक करण्यात आली होती.

पाहा व्हिडीओ :