अहमदनगर : सरकारने लोकपाल नियुक्ती करावी या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. अण्णा यावेळी म्हणाले की, "सध्या सत्तेत असलेलं भारतीय जनता पक्षाचं सरकार विरोधकांच्या बाकावर बसलं होतं, तेव्हा या लोकांनी लोकपालसाठी रान पेटवलं होतं. परंतु सत्तेत आल्यानंतर हे सगळे नेते गप्प का?" असा सवाल अण्णांनी उपस्थित केला आहे. ते म्हणाले की, "तेव्हाचे विरोधक सत्तेत आल्यावर आता गद्दारी करत आहेत. या सरकारवर माझा विश्वास राहिलेला नाही."



अण्णा म्हणाले की, "राज्य सरकार म्हणत आहे की, माझ्या 90 टक्के मागण्या मान्य झाल्या आहेत. परंतु हे सरकार खोटारडं आहे. माझ्या मागण्या मान्य झालेल्या नाहीत. मागण्या मान्य झाल्या असत्या तर मी कशाला उपोषणाला बसलो असतो? मागण्या मान्य होऊन उपोषणाला बसायला मी वेडा आहे का?"

उपोषणाबाबत अण्णा म्हणाले की, "सरकार मागण्या मान्य करत नाही तोवर उपोषण सुरुच ठेवणार आहे."

2013 मध्ये भाजप सरकारने तुमचा वापर केला असे राज ठाकरे म्हणाले, त्याबद्दल काय सांगाल? असा प्रश्न पत्रकारांनी अण्णांना विचारला. त्यावर अण्णा म्हणाले की, "हे सत्य आहे. लोकपालच्या आंदोलनामुळे भाजपची सत्ता आली. परंतु आत्ता त्यांना माझ्या आंदोलनाचा विसर पडला आहे. त्यामुळे आता देशातील सत्ता बदलून परिवर्तन होणार नाही, इथली व्यवस्था बदलायला हवी."