अहमदनगर : सरकारने लोकपाल नियुक्ती करावी या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे राळेगणसिद्धी येथे उपोषणाला बसले आहेत. आज अण्णांच्या उपोषणाचा सहावा दिवस आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज राळेगणसिद्धी येथे जाऊन अण्णांची भेट घेतली. अण्णांच्या भेटीनंतर राज ठाकरे यांनी अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. यावेळी राज म्हणाले की, "हे सरकार गाडण्यासाठी मी अण्णांसोबत आहे."
अण्णांची भेट घेतल्यानंतर राज ठाकरे म्हणाले की, "हे मोदी सरकार निर्ढावलेले आहे, निर्दयी आहे. पंतप्रधानांनी अण्णांना उपोषणासाठी शुभेच्छा पाठवणे हा तर निर्लज्जपणा आहे. अण्णा हजारे जगले काय आणि मेले काय याचा सरकारला काहीही फरक पडत नाही."
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि अण्णा हजारे यांचे जुने सहकारी अरविंद केजरीवाल यांच्यावरही राज यांनी टीका केली आहे. राज म्हणाले की, "अण्णांमुळे केजरीवाल जगाला माहीत झाले. अण्णांचा वापर करुन केजरीवाल मोठे झाले. त्यामुळे केजरीवाल यांनी आतापर्यंत अण्णांना भेटायला यायला हवं होतं, परंतु ते अण्णांना भेटायला येत नाहीत."
सहा दिवसांपासून अण्णा हजारे उपोषणाला बसले आहेत. परंतु अद्याप सरकारकडून अण्णांच्या मागणीचा कोणत्याही प्रकरचा विचार झालेला नाही. त्यामुळे 8 किंवा 9 तारखेपर्यंत सरकारने लोकपाल नियुक्तीबाबत निर्णय घेतला नाही तर पद्मभूषण पुरस्कार परत करणार, असा निर्वाणीचा इशारादेखील अण्णा हजारे यांनी सरकारला दिला आहे. कायदा होऊन 5 वर्षे झाली तरी सरकार लोकपाल नेमायला तयार नाही. लोकपालची नियुक्ती होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही, अशी भूमिका अण्णांनी घेतली आहे.
हे सरकार गाडण्यासाठी मी अण्णांसोबत आहे : राज ठाकरे
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
04 Feb 2019 12:45 PM (IST)
सरकारने लोकपाल नियुक्ती करावी या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे राळेगणसिद्धी येथे उपोषणाला बसले आहेत. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज राळेगणसिद्धी येथे जाऊन अण्णांची भेट घेतली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -