मुंबई : राज्यातील अनेक भागात पावसाचं आगमन झालं आहे. मुंबईसह उपनगर भागातही पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. अशात 13 आणि 14 जूनला मुंबईत जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. या दोन दिवसांच्या कालावधी दरम्यान मुंबई शहर आणि उपनगरातील काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या दोन तीन दिवसांपासूनच मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर प्रचंड पाऊस पडतोय. या पावसात घाबरवणारी गोष्ट म्हणजे ढगांचा गडगडाट आणि चमकणाऱ्या विजा. नेहमी मान्सूनच्या पावसात न दिसणाऱ्या या विजा इतक्या मोठ्या प्रमाणात का कडाडताना दिसतायते हा प्रश्न सगळ्यांना पडलाय. यासाठी तज्ज्ञांच्या मते त्याला दोन कारणं आहेत.
एक तर मान्सून महाराष्ट्रात दाखल जरी झाला असला तर हा मान्सूनचा अगदी सुरुवातीचा काळ आहे. त्यामुळे या पावसात अजूनही मान्सूनचे सगळे गुणधर्म आलेले नाहीत. त्यामुळे बरेचदा जून महिन्यातल्या सुरुवातीच्या पावसादरम्यान असा विजांचा कडकडाट बघायला मिळतो.
दुसरं कारण म्हणजे तांत्रिकदृष्ट्या ऑफ ओअर ट्रफच्या निर्मितीतून पावसाचा जोर वाढतोय, असं म्हटलं जात असलं तरी गेल्या काही दिवसातला पाऊस हा बऱ्यापैकी लोकलाइज्ड आहे. म्हणजे पश्चिम उपनगरात असेल तर पूर्वमध्ये नाही किंवा वसई विरारला असेल तर वरळीला नाही, असं दिसून येतंय. म्हणजे पाऊस एकाच वेळी अनेक ठिकाणी पडत नाहीये.
यात पाऊस देणाऱ्या ढगांची निर्मिती फार वेगानं होतांना दिसतेय. अगदी कमी वेळात 14 ते 15 किमीचे ढग तयार होत आहेत. मोठ्या उंचीवर -40 ते -50 डिग्री इतकं तापमान कमी होत आहे. त्यातून तिथे गारांची निर्मिती होतेय आणि गारांच्या घर्षणातून विजांची निर्मिती हा प्रकार गेले काही दिवस होतो आहे. एकदा मान्सून सर्व देशभर पसरला की ढगांची उंची इतकी वाढणार नाही आणि त्यावेळी विजा आणि गडगडाटही पूर्णपणे थांबेल असं तज्ञांचं मत आहे.