मुंबई : गेल्या दोन-तीन दिवसापासून भाजपच्या गोटात हालचालींना वेग आलाय. भाजपचे महत्त्वाचे नेते दिल्ली मुक्कामी आहेत आणि गुप्त भेटी घेत आहेत. महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्ष बदलण्यासाठी धावाधाव सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. महाराष्ट्र भाजपच्या दृष्टीने या घडामोडी महत्त्वाच्या आहेत. महाराष्ट्रातून भाजपची सत्ता जाऊन पावणे दोन वर्ष झाली आहेत. त्यात कोरोनाची लाट आली. त्यामुळे संघटनात्मक पातळीवर कुठल्याही घडामोडी झाल्या नाही. याच पार्श्वभूमीवर भाजपचे दिग्गज नेते चार दिवस दिल्ली मुक्कामी आहेत. आणि यातून प्रदेशाध्यक्ष बदलाच्या हालचालींना वेग आल्याची चर्चा सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चंद्रकांत पाटील यांची गच्छंती होऊ शकते.भाजपकडून सध्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी अशिष शेलार आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावांची चर्चा आहे.
आशिष शेलार
आशिष शेलार हे मुंबईतून भाजपचा प्रतिनिधित्व करतात. फडणवीस सरकार मध्ये त्यांनी शिक्षण मंत्री म्हणून काम केलं. गेल्या वेळी मुंबई महापालिका निवडणुकीत घवघवीत यश मिळवण्यात शेलार यांचा सिंहाचा वाटा होता .गेल्या चार महिन्यापासून अशिष शेलार महाराष्ट्रभर दौरे करत आहेत. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र त्यांनी पिंजून काढला आहे. येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेशी दोन हात करायचे असतील तर शेलार यांच्या चेहऱ्याचा फायदा होऊ शकतो
चंद्रशेखर बावनकुळे
चंद्रशेखर बावनकुळे विदर्भातील नेतृत्व आहे. ओबीसी चेहरा म्हणून भाजपमध्ये त्यांना मान्यता आहे. गेल्या वेळी बावनकुळे यांना तिकीट मिळाले नसल्यामुळे विदर्भामध्ये नाराजी आहे. ती नाराजी दूर करण्यासाठी बावनकुळे यांना संधी मिळू शकते. जुलै 2019 रोजी चंद्रकांत पाटील यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली. भाजपच्या घटनेनुसार तीन वर्ष प्रदेशाध्यक्ष पदाची टर्म असते. त्यानुसार चंद्रकांत पाटील यांच्याकडे जुलै 2021 पर्यंत प्रदेशाध्यक्षपद राहू शकते. पण सूत्रांच्या माहितीनुसार चंद्रकांत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून पायउतार व्हावं लागू शकतं.
आशिष शेलार हे अमित शाह यांच्या जवळचे मानले जातात. गेल्या वेळी मुंबई महापालिकेत त्यांनी चांगली कामगिरी केली. पण त्यांना शिक्षण मंत्री पदावर समाधान मानावे लागले. आताही मुंबईऐवजी नवी मुंबई महापालिकेचे प्रभारी झालेत. चंद्रशेखर बावनकुळे हे देवेंद्र फडणवीस यांच्या गटातले मानले जातात. गडकरी आणि फडणवीस या दोघांशीही बावनकुळे यांचं सख्य आहे. तर चंद्रकांत पाटील हे अमित शाह यांच्या गटातील आहेत. आपलं प्रदेशाध्यक्ष पद टिकावं यासाठी चंद्रकांत पाटील दिल्लीत लॉबिंग करत असल्याचीही माहिती आहे.
चंद्रकांत पाटील प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर 2019 च्या निवडणुका झाल्या.विधानसभेत भाजपाला एकशे पाच जागा मिळाल्या परंतु शिवसेनेबरोबर मतभेद झाल्यामुळे भाजपला सत्ता राखता आली नाही.त्यानंतर झालेल्या विधान परिषद निवडणुकीत पुणे,नागपूर सारखा बालेकिल्ला असलेली जागाही भाजपला राखता आली नाही. चंद्रकांत पाटील यांच्या खानापूर ग्रामपंचायतीवरही भाजपाचा झेंडा फडकला नाही पण पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने यश मिळालं. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातील जागा भाजपने मिळवली
चंद्रकांत पाटील यांच्या कारकिर्दीवर नजर टाकली तर त्यात यशापयश आहे. त्यामुळे टर्म संपण्यापूर्वीच चंद्रकांत पाटील यांना पदावरून हटवले जाऊ शकतं. येत्या काही दिवसात त्यावर शिक्कामोर्तब होईल. अर्थात पाटलांच्या जागी दिल्लीतील पक्षश्रेष्ठी शेलार यांच्या पारड्यात वजन टाकतात की बावनकुळेना संधी मिळते हे बघावे लागेल.