सांगली : ‘शेवटी विजय हा सत्याचाच होत असतो’, असं सांगत भिडे गुरुजी यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. हिंसाचाराच्या आरोपानंतर भिडे गुरुजी यांनी माध्यमांशी प्रथमच संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हिंसाचाराची सखोल चौकशी करुन दोषींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली.


भिडे गुरुजींना अटक करण्याची मागणी भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. अटक न केल्यास पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. मात्र ज्या माणसाच्या अटकेवरुन राज्यात संघर्ष सुरुय, त्या माणसाची कहाणी आहे तरी काय? असा प्रश्न सर्वांच्या मनात येणं स्वाभाविक आहे.

कोण आहेत संभाजी भिडे गुरुजी?

नाव...  संभाजीराव भिडे

ओळख... महाराष्ट्रातल्या लाखो शिवप्रेमींचं श्रद्धास्थान..

कार्य... महाराष्ट्रातल्या तरुणांमध्ये शिवप्रेम रुजवणं

आरोप... कोरेगाव भिमामध्ये दंगल घडवल्याचा

पण शिवप्रेमींच्या गळ्यातला ताईत असलेला या माणसाची कहाणी आहे तरी काय?

1934 साली जन्म झालेले संभाजी भिडे मूळचे सांगलीचे... साताऱ्यातल्या वारुगड किल्ल्याचे वंशपरंपरागत सबनीस... त्यामुळे जन्मापासूनच शिवछत्रपतींच्या विचारांचे पाईक...

सांगलीत भिडे गुरुजींचं वास्तव्य आहे. सांगलीतल्या गावभागात असलेलं हे अत्यंत साधं घर भिडे गुरुजींचंच... पण याच घरातून संभाजी भिडे गुरुजींनी शिवप्रेमी तरुणांची फौज निर्माण केली. पण इतकी साधी राहणी असलेला माणूस हा शिवप्रेमी तरुणांचं श्रद्धास्थान कसा बनला?

साधं धोतर... पांढरा ढगळा शर्ट... आणि कायम अनवाणी... भिडे गुरुजींनी अख्खा महाराष्ट्र अनवाणीच पालथा घातला.. आणि त्याचं मुख्य कारण होतं... गडकोट संवर्धन... धरणी ही माता... त्यामुळे त्या धरणीवर जोडे घालणार नाही... ही प्रतिज्ञा...

कुठेही पोहोचण्यासाठी सायकल... महामंडळाची बस... किंवा त्यांचे दोन पाय... दुर्गामाता दौड, गडकोट मोहीम यांचे प्रणेतेही भिडे गुरुजीच.... श्री शिवप्रतिष्ठानच्या झेंड्याखाली... कधीकाळी हाताच्या बोटावर मोजण्याइतपत शिवप्रेमी घेऊन सुरु झालेल्या या मोहिमेत आता महाराष्ट्रभरातले हजारो शिवप्रेमी सामील झाले आहेत...

भल्या पहाटे 150 सूर्यनमस्कार... 150 जोर आणि 150 दंडबैठका... सर्वांग व्यायम... ही त्यांच्या दिवसाची सुरुवात आहे.

संभाजी भिडे यांची आजवर महाराष्ट्रात अनेक व्याख्याने झाली आहेत. त्यांच्या वक्तृत्वामुळे हजारो तरुण त्यांचे अनुयायी झाले. शिवाय धर्मवीर संभाजी महाराज बलिदान मास, दुर्गामाता दौड, धारातीर्थ यात्रा आणि शिवराज्यभिषेक दिन यामुळे त्यांच्या फौजेत भर पडत गेली.

उच्च विद्या विभूषित भिडे गुरुजी

बऱ्याच जणांना माहित नसेल... पण संभाजी भिडे गुरुजी हे उच्च विद्या विभूषित आहेत. अणुविज्ञान शाखेत त्यांनी एमएस्सी तर केलंच आहे... शिवाय त्या विषयात त्यांना सुवर्णपदकही मिळालंय.

भिडे गुरुजी अनेक वर्षांपासून संघाचे स्वयंसेवक होते. पण काही वादामुळे भिडे गुरुजींनी 1980 साली संघाचा निरोप घेतला आणि 1984 साली प्रतिसंघ स्थापन श्री शिव प्रतिष्ठानची स्थापना केली. संघाच्या संचलनाला पर्याय म्हणून दुर्गामाता दौड सुरु झाली, ज्याला तरुणांचा उदंड प्रतिसाद मिळाला आणि तिथूनच भिडे गुरुजींची लोकप्रियता शिखरावर पोहोचली.

भिडे गुरुजी आणि वाद

नुकताच त्यांनी रायगडावर 32 मण इतक्या वजनाच्या सोन्याचं सिंहासन बसवण्याचा संकल्प केला आहे. अर्थात शिवप्रेम रुजवणाऱ्या या माणसाबाबत काही वादही समोर आले. मिरजमध्ये उफाळलेल्या दंगलीमध्ये सक्रीय भाग घेतल्याचा आरोप होता. 2017 मध्ये पुण्यात पालखीमार्गात अडथळा आणल्याचा आरोप, जोधा अकबर सिनेमाला पश्चिम महाराष्ट्रात अडथळा आणल्याचा आरोप असे अनेक आरोप लागले तरी संभाजी भिडे गुरुजींचे हजारो अनुयायी आजही त्यांच्यासोबत आहेत.

कोरेगाव-भीमातल्या हिंसाचारामध्ये संभाजी भिडे गुरुजींचं नाव आल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता आहे आणि त्याच निमित्ताने संभाजी भिडे गुरुजी कोण आहेत, हेच जाणून घेण्याचा हा प्रयत्न..