Who is Pravin Gaikwad: संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या घृणास्पद हल्ल्यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली आहे. प्रवीण गायकवाड अक्कलकोटमध्ये श्री फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाकडून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. या कार्यक्रमापूर्वीच त्यांना कुटुंबीयांसोबत असूनही अडवून अंगावर शाई ओतण्यात आली. यानंतर महाराष्ट्रात एकच राजकीय खळबळ उडाली. या घटनेचा विविध सामाजिक संघटनांसह राजकीय नेते आणि पक्षांनी सुद्धा निषेध व्यक्त केला. प्रवीण गायकवाड हे संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून महाराष्ट्रातून कार्यरत असून आजवर मुलांना कायदेशीर कचाट्यात न अडकता बहुजनांच्या मुलांना आरक्षणातून अर्थकारणाकडे नेण्याचा प्रयत्न करत आहेत. चळवळीच्या माध्यमातून आजवर शेकडो तरुणांनी अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा या महत्वाकांक्षी मोहिमेतून जगभरातील 52 देशात नोकरी मिळवली आहे. मराठा आरक्षणाच्या भवितव्य आणि कायदेशीर पेचप्रसंग लक्षात घेता प्रवीण गायकवाड या संकल्पनेतून काम करत आहेत. 

प्रवीण गायकवाड कोण आहेत?

प्रवीण गायकवाड यांनी 'अहद ऑस्ट्रेलिया, तहद कॅनडा, अवघा मुलुख आपला' म्हणत बहुजनांच्या लेकरांना आरक्षणातून अर्थकारणाचा मार्ग दाखवून दिला आहे. डोक्यात शिवाजी, खिशात गांधीजी असा त्यांचा संकल्प आहे. या चळवळीच्या माध्यमातून तरुणांना नोकरीसह उद्योजक  होण्यासाठी कशा पद्धतीने प्रेरित करत आहेत याबाबत 'अहद ऑस्ट्रेलिया, तहद कॅनडा, अवघा मुलुख आपला' मोहिमेसाठी प्रवीण गायकवाड यांच्यासोबत अत्यंत जवळून काम केलेल्या अजयसिंह सावंत यांच्याशी एबीपी माझाने संवाद साधला.  अजयसिंह सावंत यांनी सांगितले की, ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्यावेळी त्यांनी एक संकल्पना मांडली होती, ती म्हणजे “अहद तंजावर तहद पेशावर, अवघा मुलुख आपला !” तंजावर हे ठिकाण भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील तामिळनाडू राज्याच्या टोकाला असून पेशावर हे ठिकाण पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेजवळ आहे. थोडक्यात तंजावरपासून पेशावर पर्यंतचा मुलुख आपला असावा असे महाराजांना का वाटत होते ? तर त्यामागे महाराजांची फार मोठी दूरदृष्टी होती. 

'अहद ऑस्ट्रेलिया, तहद कॅनडा, अवघा मुलुख आपला' 

याच संकल्पनेतून बहुजनांच्या मुलांना आरक्षणापासून दूर नेत उद्योजक होण्यासाठी आणि क्षमता ओळखून परदेशात जाण्यासाठी  'अहद ऑस्ट्रेलिया, तहद कॅनडा, अवघा मुलुख आपला' ही मोहीम 2015 पासून सुरु करण्यात आली. या मोहिमेचा उद्देश हा आरक्षणातून अर्थकारणाकडे असाच आहे. मराठा आरक्षणाची मागणी गेल्या चार दशकांपासून होत असली, तरी त्यामध्ये कायदेशीर अडथळे ज्ञात आहेत. आंदोलनातून होणारी ससेहोलपट आणि त्यातून होणारा करिअरवर परिणाम पाहता 'अहद ऑस्ट्रेलिया, तहद कॅनडा, अवघा मुलुख आपला' मोहिमेला गती देण्याचा निर्धार प्रवीण गायकवाड यांनी केला. या मोहिमेला गेल्या दशकभरापासून मोठं यश आलं असून आतापर्यंत 52 देशात मुलांनी या माध्यमातून नोकरी मिळवली असल्याचे अजयसिंह सावंत यांनी सांगितलं. केरळमधील लोकांनी परेदशातून पाठवलेल्या कोट्यवधींची रक्कम पाहता ती आपल्या बहुजनांच्या तरुणांनी सुद्धा त्याच पद्धतीने अवलंब करून महाराष्ट्रात परकीय चलन का आणू नये? हा विचार प्रवीण गायकवाड यांचा असल्याचेही ते म्हणाले. 

संभाजी ब्रिगेडच्या वेबसाईटवर याबाबत प्रवीण गायकवाड यांचे मनोगत असून ते म्हणतात की, आपल्या सर्वात पूर्वेला ऑस्ट्रेलिया आणि सर्वात पश्चिमेला कॅनडा असे हे दोन देश आहेत. या दोन्ही देशांच्या दरम्यान सहा खंडात (ऑस्ट्रेलिया, आशिया, युरोप, आफ्रिका, दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका) यामध्ये संपूर्ण जग पसरले आहे. भारताच्या तुलनेत बाहेर जगात लोकसंख्येचे प्रमाण कमी आहे, त्यामानाने संधी प्रचंड आहेत. भारतातील पंजाबी, सिंधी, केरळी, तमिळ, गुजराती, मारवाडी, इत्यादि लोकांची उदाहरणे आपल्यासमोर आहेत. या लोकांनी जगातल्या संधी हेरल्या आणि तिथे जाऊन आपले अर्थकारण मजबूत केले.

उद्योग आणि व्यवसायाच्या संधी हेराव्यात

आता आपल्या लोकांनीही ऑस्ट्रेलियापासून कॅनडापर्यंत पसरलेल्या या प्रदेशात मुलूखगिरी करावी, तिथं जाऊन नोकरी, उद्योग आणि व्यवसायाच्या संधी हेराव्यात, त्यातून आपले अर्थकारण मजबूत करावं आणि जगभर आपली कम्युनिटी फार्मिंग करावी अशी संभाजी ब्रिगेडची भूमिका आहे. त्यासाठीच “अहद ऑस्ट्रेलिया, तहद कॅनडा, अवघा मुलुख आपला ! ही संकल्पना रुजवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आज हा विचार पेरला तर निदान भविष्यात तरी आमची लोकं समृद्ध व आर्थिकदृष्ट्या सक्षम बनतील हा आमचा विश्वास आहे.

एका बाजूने आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक असताना प्रवीण गायकवाड आपली भूमिका मांडताना म्हणतात, मराठा आरक्षणाच्या या लढ्याला आता 40 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. या लढ्यात मराठा क्रांती मोर्चासारखे रस्त्यावरील सर्वात मोठे जनआंदोलन झाले. शेकडो समाजबांधवानी आत्मबलिदान केले. हजारो केसेस झाल्या. कित्येक कागदोपत्री पुरावे देऊन मराठा समाजाने आपल्या सामाजिक मागासलेपण सिद्ध केले. अखेरीस राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाचे सामाजिक मागासलेपण मान्य करुन त्यांना आरक्षण देण्याची शिफारस केली. मात्र तत्कालीन सरकारने आरक्षणाची अंमलबजावणी करताना 102 व्या घटनादुरुस्तीचा संदर्भ लक्षात न घेता नवीन वेगळा प्रवर्ग निर्माण केला. 

त्यामुळे मराठा समाजाला पुढील अनेक कायदेशीर अडथळ्यांना सामोरे जावे लागले. शेवटी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने अनेक युक्तिवाद ऐकून मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही असा निर्णय दिला आणि आरक्षणाचे दरवाजे मराठ्यांसाठी बंद केले. आजघडीला मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण मिळवायचे असेल, तर त्यासाठी घटनादुरुस्ती शिवाय दुसरा पर्याय उरला नाही. मात्र घटनादुरुस्ती करण्यासाठी देशपातळीवर आवश्यक असणारे खासदारांचे संख्याबळ एकट्या मराठा समाजाकडे नसल्याने त्यांना आरक्षण मिळेल याची शाश्वती नाही. घटनात्मक तरतुदी आणि राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे. नजीकच्या काळात दूरदूरपर्यंत ते दिसतही नाही. तरीही गेली 40 वर्षे झाली मराठा समाज भाबड्या आशेपायी केवळ आरक्षण या एकाच विषयाभोवती फिरत आहे. 

आरक्षणाकडून अर्थकारणाकडे याबाबत मनोगत व्यक्त करताना प्रवीण गायकवाड म्हणतात, आरक्षणाच्या इतक्या वर्षांच्या प्रदीर्घ लढ्यानंतरही जर मराठ्यांच्या हातात शून्यच आला असेल, तर आता त्या शून्यातूनच विश्व निर्माण करण्यासाठी त्याला काही मोठे बदल स्वीकारावे लागणार आहेत.मराठा समाजाच्या आरक्षण चळवळीतील प्रमुख घटक या नात्याने संभाजी ब्रिगेडने स्वतःहुन एक पाऊल पुढे येत मराठा समाजाला आरक्षणाच्या भावनिक विश्वातून अर्थकारणाच्या वास्तविक जगात आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.

समाजाला याच वास्तवाची जाणीव करुन देण्याचा संभाजी ब्रिगेडचा प्रयत्न

संघटनेच्या स्थापनेला 25 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पार पडलेल्या रौप्यमहोत्सवी अधिवेशनाचे घोषवाक्यच “आरक्षणाकडून अर्थकारणाकडे” असे घेऊन संभाजी ब्रिगेडने समाजात एक नवी चर्चा सुरु केली आहे. आजच्या काळात एकट्या आरक्षणाने आपले सगळे प्रश्न सुटणार नाहीत. उलट आपले बहुतांश प्रश्न हे आर्थिक स्वरूपाचे असल्याने त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपल्याला आरक्षणाच्या पलीकडे असणाऱ्या आर्थिक जगाच्या स्पर्धेत उतरावे लागेल हे संभाजी ब्रिगेडचे सांगणे आहे. काळाची पावले ओळखून मार्गक्रमण करण्यातच शहाणपण असते. जगाच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी प्रत्येकाने आर्थिकदृष्ट्या सक्षम बनले पाहिजे. मराठा समाजाला याच वास्तवाची जाणीव करुन देण्याचा संभाजी ब्रिगेडचा प्रयत्न आहे.