Maharashtra Honey Trap Case: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ माजू शकते. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभेत पेन ड्राइव्ह दाखवला. नाशिकमध्ये 72 वरिष्ठ अधिकारी आणि काही नेते हनी ट्रॅप प्रकरणात अडकले आहेत, असे ते म्हणाले. आता हे प्रकरण जळगाव म्हणजेच जामनेरपर्यंत पोहोचले आहे. भाजपमध्ये सामील झालेल्या प्रफुल्ल लोढावर हनी ट्रॅपचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि अटकही करण्यात आली आहे. नाशिकच्या हनी ट्रॅप प्रकरणात अनेक वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि नेते अडकल्याची चर्चा आहे. आता या प्रकरणाची मुळे जळगावपर्यंत पोहोचली आहेत. जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील रहिवासी प्रफुल्ल लोढावर मुंबईत दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एक POCSO कायद्याचा, दुसरा बलात्कार आणि हनी ट्रॅपचा आहे. दुसरीकडे, संजय राऊत यांनी हनी ट्रॅप प्रकरणात फोटो ट्विट करत हल्लाबोल करत सीबीआय़ चौकशीची मागणी केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिशाभूल करत असल्याचे म्हटले आहे.
प्रफुल लोढावर गुन्हा दाखल
दरम्यान, पोलिसांनी प्रफुल लोढा यांना अटक केली आहे. अटकेनंतर मुंबई पोलिसांनी प्रफुल्ल लोढाच्या जळगाव, जामनेर आणि पहूर येथील मालमत्तेची झडती घेतली. पोलिसांनी त्याच्या घरातून लॅपटॉप, पेन ड्राइव्ह आणि काही इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त केल्या आहेत. प्रफुल्ल लोढा जामनेर येथे राहतो. त्याच्याविरुद्ध अंधेरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात पॉक्सो, बलात्कार आणि हनी ट्रॅपचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वीही साकीनाका पोलिस ठाण्यात प्रफुल्ल लोढा यांच्याविरुद्ध पॉक्सो आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मुलींसोबत चुकीचे कृत्य केल्याचा आरोप
साकीनाका पोलिसांनी 5 जुलै रोजी चकाला येथील लोढा हाऊस येथून अटक केली. साकीनाका पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात, 62 वर्षीय प्रफुल्ल लोढावर 16 वर्षीय मुली आणि तिच्या मैत्रिणीला नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्यासोबत चुकीचे कृत्य केल्याचा आरोप आहे. लोढा यांनी दोन्ही मुलींसोबत चुकीचे कृत्य केले आणि त्यांचे अश्लील फोटोही काढले असा आरोप आहे. एवढेच नाही तर त्याच्यावर लोढा हाऊसमध्ये बंद करून मुलींना धमकावण्याचाही आरोप आहे.
प्रफुल्ल लोढाच्या मालमत्तेवर छापा
आता अंधेरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी त्याच्याविरुद्ध पॉक्सो, बलात्कार आणि हनी ट्रॅप अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रफुल्ल लोढा यांना अटक केल्यानंतर, मुंबई पोलिसांनी जळगाव, जामनेर आणि पहूर येथील मालमत्तांची झडती घेतली. झडती दरम्यान पोलिसांनी लॅपटॉप, पेन ड्राइव्ह आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली आहेत.
एक बटण दाबलं, तर सगळं काही उघड होईल, प्रफुल लोढा आहे तरी कोण?
प्रफुल लोढा मूळचा जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील पहूर पेठ गावाचा रहिवासी आहे. गावात वडिलोपर्जित शेती, प्लॉट,सिनेमा थिएटर ,त्याच बरोबर विविध ठेकेदारी व्यवसाय राहिला आहे. मंत्री गिरीश महाजन सरपंच झाल्यानंतर त्यांच्या सोबत त्याने भाजप कार्यकर्ता ते आरोग्यसेवक म्हणून जवळपास वीस वर्ष काम केलं आहे. 1995 साली पंचायत समितीसाठी निवडणूक लढवली, पण पराभव पत्करावा लागला होता.गिरीश महाजन मंत्री झाल्यानंतर काही कालावधीत त्यांच्याकडे तो मोठ्या कामांची मागणी करू लागल्याने त्यांच्यामध्ये वितुष्ट आले. यानंतर गिरीश महाजन यांना शह देण्यासाठी त्याने राष्ट्रवादीमधे प्रवेश केला होता. याच काळात त्याने आपल्याकडे एक बटण दाबले तर सगळं काही उघड होईल, असा गिरीश महाजन यांचे नाव न घेता दावा केला होता. 2024 मधील लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीचे इच्छुक उमेदवार असल्याचा दावा करत उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, पाच दिवसात माघार घेतली होती. त्यानंतर पुन्हा भाजपशी जुळणी केल्याचे सांगितले जात आहे. भाजपमध्ये किंवा इतर पक्षात असतानाही त्याच्याकडे कोणतेही पद मात्र देण्यात आले नव्हते. एकनाथ खडसे यांच्या विरोधातही त्याने मद्यपान करून पत्रकार परिषद घेतली होती. त्यांच्या मुलाच्या आत्महतेबाबत प्रश्न चिन्ह उपस्थित केले होते.
इतर महत्वाच्या बातम्या