नागपूर : एमएस धोनी चित्रपटातून अमित देशपांडेचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नागपुरचा माजी क्रिकेटपटू, यष्टीरक्षक असलेल्या अमितचा उल्लेख आला आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या.

साल 2000 अंडर 19 वर्ल्डकपसाठी महेंद्र सिंह धोनीच्या नावाची साधी चर्चाही नव्हती. तेव्हा नागपुरच्या अमित देशपांडेची चर्चा सिलेक्शन कमिटीत झाली. विदर्भात एकाच टेस्टमध्ये दोन्ही इनिंग्समध्ये दोन शतकं ठोकण्याचा पराक्रमही अमितच्या नावावर आहे. हा रेकॉर्ड आजपर्यंत तरी मोडला नाही.

चित्रपटामुळे नागपूरमध्ये अमितची चर्चा सुरु झालीय. अमित विदर्भाकडून प्रथम श्रेणी किक्रेट खेळला. 49 सामन्यांमध्ये 2857 धावा काढल्या. नाबाद 157 धावा त्याच्या नावावर जमा आहेत. 4 शतकं, 15 अर्धशतकं, 109 कॅचेस आणि 15 स्टंपिंग अमितच्या नावे आहेत.

क्रिकेटच्या राजकारणाबद्दल अमित फारसं बोलायला तयार नाही. मात्र त्यावेळी दैनिकात आलेल्या बातम्या बरंच काही सांगून जातात. अंडर 19 भारतीय संघ जाहीर करण्याच्या दोन दिवस आधी हरियाणाचा अजय रात्रा शिबिरात दाखल झाला आणि भारतीय संघासोबत विकेटकिपर म्हणून श्रीलंकेला सुद्धा गेला. त्यामुळे अमितचा पत्ता कट झाला.

2010 पर्यंत अमित रणजी क्रिकेट खेळला. पण पुन्हा काही त्याला भारतीय संघात स्थान मिळालं नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं नाव करण्याचं अमितचं स्वप्न भंगलं असलं तरी तो खचला नाही. पुन्हा नव्या दमानं मुलांना प्रशिक्षण देतो. कदाचित याच मुलांपैकी एखादा क्रीडापटू उद्या अमितचं अधुरं राहिलेलं स्वप्न पूर्ण करेल.