अकोला : देशभरात सध्या एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. एका तरूण साधूनं अत्यंत तन्मयतेनं सुंदर गायिलेल्या 'शिवतांडव स्तोत्रा'चा हा व्हिडीओ आहे. 'यु-ट्यूब'वर जगभरातील लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. त्यामुळे या 'व्हिडीओ'त आपल्या सुंदर आणि पहाडी आवाजात 'शिवतांडव स्तोत्र' गाणाऱ्या या तरुण साधुबद्दल जगभरातील 'नेटीझन्स'मध्ये उत्सुकता आणि कुतूहल आहे. या तरूण साधूचं नाव आहे 'कालीचरण महाराज'. 'कालीपूत्र कालीचरण महाराज'. जगभरात सध्या प्रसिद्धीच्या शिखरावर असलेले कालिचरण महाराज आहेत अकोल्याचे. कालीचरण महाराजांविषयी जाणून घेण्याची प्रत्येकाची उत्सुकता या 'व्हायरल' झालेल्या व्हिडिओनं ताणून धरली आहे.

या व्हायरल झालेल्या व्हिडीओनं देशभरातील नेटीझन्सनं अक्षरश: वेड लावलंय. शिवतांडव स्तोत्र एखाद्या कसलेल्या गायकापेक्षाही तन्मयतेनं गाणारा हा तरूण...वेष अगदी एखाद्या 'मॉडर्न' साधुसारखा.... या व्हिडीओतून व्हायरल झालेले व्यक्ती आहे. अकोल्यातील 'कालीपुत्र' कालिचरण महाराज यांनी मध्यप्रदेशातील भोजपुर येथे एका शिवमंदिरात शिवतांडव स्तोत्र गायिलं. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सध्या चांगलाच धुमाकूळ घालतो आहे. हा व्हिडीओ मध्यप्रदेशातील रायसेन जिल्ह्यातील भोजपूर गावातल्या सोमनाथ शिवमंदिरातील आहे.

 कोण आहेत 'कालीचरण महाराज' 

'कालीचरण महाराज' अकोल्यातील जूने शहर भागातील शिवाजीनगर मध्ये 'भावसार पंचबंगला' भागात राहतात. अकोल्यातील तरुणाईमध्ये या महाराजांची मोठी क्रेझ आहे. मात्र, कालीचरण महाराज आपल्या भूतकाळाविषयी फारसं काही कुणाला सांगत नाहीत. त्यांचं मुळ नाव 'अभिजीत धनंजय सराग'. शिवाजीनगर भागातील धनंजय आणि सुमित्रा सराग या दांपत्याच्या पोटी कालीचरण महाराज यांचा जन्म झाला. लहानपणी अभिजीत अत्यंत खोडकर होता. त्याला शाळेतही जाण्याचा कंटाळा यायचा. लहानपणापासून त्याचा ओढा अध्यात्माकडे अधिक. त्यातही तो कालीमातेची आराधना करायचा. घरच्यांना तो शिकावा, काहीतरी वेगळं काम करावं असं वाटायचं. मात्र, या परिस्थितीतही त्याचा अध्यात्मावरचा विश्वास आणि ओढा वाढत गेला. पुढे अभिजीतचा 'कालीपुत्र कालीचरण' झाला. पुढे लोकांनी त्यांना 'महाराज' संबोधनं सुरू केलं. मात्र, 'कालीचरण महाराज' स्वत: आपण महाराज नव्हे तर 'कालीमाते'चा भक्त आणि पुत्र असल्याचं सांगतात.

कालीमातेला 'आई' तर अगस्ती ऋषींना मानतात 'गुरू' 

कालीचरण महाराज 'कालीमाता'चं आपली 'आई' असल्याचं मानतात. तर ते स्वत:ला अगस्ती ऋषींचा शिष्य मानतात. आधी घरच्यांना हे काहीसं वेगळं अन विचित्र वाटायचं. मात्र, कालीचरण यांच्या कठोर साधनेनं आता कुटूंबियांनी त्यांचं हे नवं रूप स्वीकारलं आहे. कालीचरण महाराज यांनी आजन्म 'ब्रह्मचर्य व्रत' पाळण्याचा निर्धार केला आहे.

 महाराजांच्या 'स्टाईल'ची तरूणाईला भूरळ 

कालीचरण महाराजांच्या स्टाईलची भूरळ अनेकांना पडतेय. जरीचे लाल कपडेच ते वापरतात. जरीची काठाची लुंगी, लाल रंगाचं 'टी शर्ट', त्यावर जरीचा लाल रंगाचा पंचा, कपाळभर गर्द लाल रंगाच्या कुंकवाचा कोरीव गोल टिळा, 'ट्रिम' केलेली दाढी, व्यवस्थित रुद्राक्षाच्या माळा लावलेल्या जटा अन गळ्यातही रुद्राक्षांची आकर्षक माळ. महाराज शरीर सौष्ठत्व राखण्यासाठी दररोज जीममध्ये व्यायाम करतात. त्यामुळे महाराजांचं शरीरही एखाद्या बॉडी बिल्डरसारखं दिसतं.

 'त्या' व्हिडीओनं महाराज आलेत जगभर चर्चेत

लॉकडाऊन सुरू होण्याआधी कालीचरण महाराज मध्यप्रदेशात होते. या दौऱ्यात मध्यप्रदेश बजरंग सेनेचे अध्यक्ष अमरीश रॉय त्यांना रायसेन जिल्ह्यातील भोजपुर गावातील सोमनाथ शिवमंदिरात घेऊन गेले होते. भोजपूरातील ओबेदुल्लागंजमधील हे शिवमंदिर फार प्राचीन आहे. या मंदिरात पाय ठेवताक्षणी कालीचरण महाराज यांनी उत्स्फूर्तपणे 'शिवतांडव स्तोत्र' गायला सुरूवात केली. अतिशय सुमधूर, लयबद्ध आणि पहाडी आवाजातील या गायनानं उपस्थित मंत्रमुग्ध झालेत. विशेष म्हणजे गायनाचं कोणतंही शास्त्रशुद्ध शिक्षण कालीचरण महाराजांनी घेतलेलं नाही. मात्र, एखाद्या निष्णात गायकालाही लाजविणारं गायन ते करतात. भोजपुर मंदिरात गातानाचा त्यांचा हा व्हिडिओ अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये चित्रीत केला. अन् पुढे सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड वेगाने व्हायरल झाला. कालीचरण महाराजांचे व्हिडिओ समाज माध्यमावर लाखोंचा टप्पा लिलया पार करायला लागलेत. कालीचरण महाराजांच्या 'शिवतांडव स्तोत्रा'चा हा व्हिडिओ जेष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी आपल्या इंस्टाग्रामवर पोस्ट करीत कालीचरण महाराजांची स्तुती केली होती.


काय आहे 'शिवतांडव स्तोत्र' 

'शिवतांडव स्तोत्र' हे संस्कृत भाषेत लिहिलेलं स्तोत्र आहे. या स्तोत्रामधून भगवान शंकराची शक्ती आणि रूपाची महती सांगण्यात आली आहे. शंकराचा परमभक्त असलेल्या 'लंकापती' रावणाने या स्तोत्राची रचना केल्याचं समजलं जातं.

कालीचरण महाराजांनी आजमावलं होतं अकोला महापालिका निवडणुकीत नशीब 

कालीचरण महाराजांनी 2017 मध्ये झालेल्या अकोला महापालिका निवडणुकीत 'नगरसेवक' पदासाठी आपलं नशीब आजमावलं होतं. प्रभाग क्रमांक दहा 'ड'मधून ते उभे होते. मात्र, कालीचरण महाराज यांचा या निवडणुकीत पराभव झाला होता. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अकोला पश्चिम मतदारसंघातून त्यांच्या उमेदवाराची मोठी चर्चा झाली होती. मात्र, त्यांनी ही निवडणूक लढवली नाही. पुढच्या काळात गोरक्षण, 'गो' सेवेसारख्या रचनात्मक कामाला वाहून घेणार असल्याचं ते सांगतात.

महाराजांच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओनं ते देशभरात चर्चेत आलेय. पुढच्या काळातही हे 'स्टारडम' आणखी वाढणार आहे. मात्र, व्हायरल झालेल्या व्हिडीओतून वाढलेल्या टीआरपीनं कालिचरण महाराजांची जबाबदारीही वाढली आहे. पुढच्या काळात ही जबाबदारी त्यांना रचनात्मक कामासाठी बळ देवो, हिच सदिच्छा...