रत्नागिरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता कोकणातील ग्रामपंचायती देखील चाकरमान्यांसाठी काही नियम आखताना दिसत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर 5 ऑगस्टपूर्वी न आल्यास हजार रूपये आकारण्याचा निर्णय डिगस या ग्रामपंचायतीनं घेतला आहे. पण, रत्नागिरी जिल्ह्यात मात्र काहीशी वेगळी आणि समाधानकारक परिस्थिती आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. कारण येणाऱ्या चाकरमान्यांना 14 दिवसांचा क्वारंटाईन काळ पूर्ण करणं गरजेचं असणार आहे. त्याबाबतचे ठराव म्हणा किंवा आवाहन हे ग्रामपंचायतीकडून केले जात आहे.


पण, 5 ऑगस्टपूर्वी गावी न आल्यास चाकरमान्यांकडून दंड न आकारण्याचा निर्णय मात्र या ग्रामपंचायतींनी घेतली आहे. रत्नागिरीतील मालगुंड आणि वरवडे या ग्रामपंचायतींनी याबाबत ठराव केला आहे. त्यामुळे चाकरमान्यांना 14 दिवस अगोदर यावं लागणार आहे. कोरोनाचं संकट पाहून हा निर्णय घेतल्याचं इथल्या ग्रामस्थांचं आणि सरपंचांच म्हणणं आहे. पण उशिरा आल्यास कोणत्याही प्रकारचा दंड मात्र आकारला जाणार नाहीय. पण येणाऱ्या चाकरमान्यांनी सर्व काळजी घ्यावी असं इथल्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे. तर सरकारनं क्वारंटाईन नियम कमी कालावधीचा केल्यास केवळ ग्राम कृतीदलाचा निर्णय अंतिम असेल असं वरवडेच्या सरपंचांच म्हणणं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये सध्या तरी अशाच प्रकारचं चित्र दिसून येत आहे. तर आम्ही सरकारचा आदेश पाळू असं मालगुंडच्या सरपंचांच म्हणणं आहे. दरम्यान चाकरमान्यांबाबत मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील अशी आशा राजापूर-लांजा मतदार संघातील शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी व्यक्त केला आहे.


चाकरमान्यांना काय असणार नियम?


- 5 ऑगस्टपूर्वी गावी येण्याचे नियोजन करावे. प्रवासाकरता पास काढावा.
- गावच्या मुळघरी चाकरमान्यांनी 14 दिवस क्वारंटाईन व्हावे. आवश्यक आणि शक्य असल्यास संस्थात्मक क्वारंटाईन व्हावे.
- उत्सव कालावधीमध्ये घरामध्ये, वाडीमध्ये सत्यनारायणाची पुजा यासारखे कार्यक्रम साजरे करायचे असल्यास कुणालाही निमंत्रण देऊ नये.
- आरती मर्यादीत स्वरूपात, अंतर ठेवून घरगुती स्वरूपात करावी.
- गौरी, गणपती निमित्त होणारे सार्वजनिक कार्यक्रम रद्द करावेत.
- गणपती आगमन, विसर्जनावेळी मिरवणुक काढू नये.
- विसर्जन वैयक्तिक पद्धतीनं करावे.
- गावाबाहेरील व्यक्तिंनी, नातेवाईकांनी बाप्पाच्या दर्शनासाठी येणे टाळावे.
- जिल्ह्यांतर्गंत कन्टेनमेंन्ट झोनमधून येणाऱ्या नागरिकांना देखील क्वारंटाईन कालावधी पूर्ण करावा लागेल.
- मास्क वापरणे बंधनकारक राहिल. (काही गावांनी मास्क न वापरणाऱ्यांना 200 रूपये दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे.)