औरंगाबाद शहराच्या दर्गा चौकातील डी-मार्टसमोर तृतीयपंथीयांचे दोन गट भिडले. या भागात पैसे गोळा करायचे असतील तर आम्हाला हफ्ता द्यावा लागेल अशी मागणी तृतीयपंथीयांच्या एका गटाने केली. पैशांच्या देवाणघेवाणीवरुन सुरुवातीला शाब्दिक चकमक झाली आणि त्यानंतर हाणामारीला सुरुवात झाली. यामधून झालेल्या चाकूहल्ल्यात एक तृतीयपंथी जखमी झाला.
हाणामारीनंतर दोघांनी पोलिस स्टेशन गाठलं. पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण केली आणि आरोपीला ताब्यात घेतलं.
एरव्ही ताब्यात घेतलेल्या आरोपीला न्यायालयात हजर करण्यापूर्वी लॉकअपमध्ये ठेवलं जातं. पण जवाहरनगर पोलिस स्टेशनमध्ये लोक नसल्याने त्याला जवळच्या क्रांतीचौक पोलिस ठाण्यात तृतीयपंथीयाला घेऊन गेले. पण त्याला ठेवायचं कुठे हा प्रश्न क्रांतीचौक पोलिसांसमोर होता. त्यांनी तृतीयपंथीयाला इतर आरोपींसोबत ठेवण्यास नकार दिला. कारण त्याला पुरुष लॉकअपमध्ये ठेवायचं की इतर कुठे? हा प्रश्न त्यांना पडला.
मग जवाहरनगर पोलिसांना या तृतीयपंथी आरोपीला आपल्या पोलिस स्टेशनमध्येच ठेवावं लागलं. बरं पुढे त्याला न्यायालयात हजर केलं, तिथे त्याला जामीन मिळाला म्हणून ठीक, नाहीतर तिथे त्याला जर पोलिस कोठडी मिळाली असती तर पोलिसांची डोकेदुखी आणखीच वाढली असती.
बदलत्या काळानुसार, तृतीयपंथीयांना थर्ड जेंडर म्हणून अधिकार मिळाला आहे. महाराष्ट्रात त्यांचं महामंडळ स्थापन करावं, अशीही मागणी आहे. पण आता पोलिस तृतीयपंथीयांसाठी एखादी कोठडी बनवा, अशी मागणी करताना दिसले तर त्यात नवल वाटायला नको.