बीड : परळी-अंबाजोगाई रस्त्यावर कन्हेरवाडी गावाजवळील जलालपूर शिवारात जेसीबी मशिनने खाणीचे खोदकाम सुरु होते. त्या ठिकाणी अचानक एक प्राचीन देवतेची मूर्ती सापडली असून त्या मूर्तीजवळ नाग बसून होता.


हे दृश्य पाहण्यासाठी व त्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी परिसरातील भाविकांनी गर्दी केली होती. त्या मूर्तीची हळद-कुंकू वाहून उदबत्ती पेटवून भाविकांनी पूजन केले. ही वार्ता वाऱ्यासारखी आसपासच्या गावात पसरली असून भाविकांचे लोंढे त्या मूर्तीकडे धावत आहेत. गर्दी वाढत असल्यामुळे या ठिकाणी दोन पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. भाविकांची गर्दी वाढली असतानाही मूर्तीपासून नाग हलायला तयार नव्हता.

तहसीलदार शरद झाडके यांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर सांगितले की, आपण बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत कळवले असून पुरातत्व खात्याला ही मूर्ती तपासणीसाठी दिली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

या घटनेचे वृत्त समजताच नागरिकांचीही गर्दी खाणीच्या परिसरात मूर्ती पाहण्यासाठी वाढू लागली. तहसीलदार शरद झाडके यांनीही  प्रत्यक्ष ठिकाणाची पाहणी केली. सदरची मूर्ती प्राचीन असून ती नेमकी कोणत्या देवतेची आहे? याबाबत आताच काही सांगता येणार नाही, परंतु आम्ही जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क केला असून भारतीय पुरातत्व खाते याकडे लक्ष देईल, असे तहसीलदार शरद झाडके यांनी सांगितले.

सध्या बघ्यांची गर्दी वाढत असून त्यातील काही भाविकांनी मूर्तीची पूजा सुद्धा केली आहे. दरम्यान सध्या या ठिकाणी दोन पोलीस तैनात करण्यात आले असून नागरिकांनी मूर्ती आवश्य पाहावी. परंतु त्यास हात न लावता दर्शन घ्यावे. ज्यामुळे या मूर्तीच्या भग्नावशेषातून मूर्तीचा इतिहास पुरातत्व खात्याला सहजपणे काढता येईल, असे आवाहन तहसीलदार झाडके यांनी केले आहे.