Ajit Pawar: राज्यात विधानसभा निवडणुकांचा नुकताच निकाल लागला. राज्यभरात महायुतीने मोठ्या प्रमाणावर जागा जिंकून मोठं यश मिळवलं आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटण्यासाठी देवगिरी बंगल्यावरती मोठी गर्दी झाली आहे. त्यांच्या शासकीय निवासस्थानी सकाळी सकाळीच कार्यकर्त्यांची मोठी गर्दी केली. अजित पवारांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या जात आहेत. अशातच यावेळी भेटण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या लाडक्या बहिणींसोबत बोलतानाच अजित पवारांचं वक्तव्य चांगलंच चर्चेत आलं आहे. आपल्या मिश्कील आणि आपल्या खुमासदार वक्तव्यांमुळे अजित पवार अनेकदा चर्चेत येणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
नेमकं काय आहे व्हिडिओमध्ये?
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा काही महिला तुळशीचा हार घालून सत्कार करतात, त्यावेळी त्यांना महाराष्ट्राचं दैवत असलेल्या विठ्ठलाची मुर्ती भेट देतात. त्यावेळी अजित पवार रुक्मिणीला कुठं सोडलं असा प्रश्न विचारतात तेव्हा महिला हसून रुक्मिणीला आणलं आहे, वहिनींकडे द्यायचं आहे म्हणतात, अजित पवारांचा (Ajit Pawar) हा मिश्किल अंदाज अनेकदा चर्चेत येतो. सध्या त्यांचा हा व्हिडिओ देखील चांगलाच चर्चेत आहे.
"दर्शन घे दर्शन... काकाचं...", काका-पुतण्याचा व्हिडिओ व्हायरल
यशवंतराव चव्हाणांच्या पुण्यतिथीनिमित्त काल (सोमवारी) प्रीतीसंगमावर शरद पवार, अजित पवार (Ajit Pawar) , रोहित पवार यांनी हजेरी लावली. त्यावेळी रोहित पवार आणि अजित पवार (Ajit Pawar) आमने-सामने आले. त्यावेळी रोहित पवार चक्क अजित पवारांच्या पाया पडले. काका-पुतण्याच्या भेटीनंतर आणि त्यावेळीच्या दोघांमधील संवादानंतर राजकीय चर्चांना जोरदार उधाण आलं आहे.
रोहित पवार समोर आल्यानंतर अजित पवारांनी (Ajit Pawar) त्यांना हस्तालोंदन केलं आणि त्यांना काकाच्या पाया पड, असं म्हणत खाली वाकून नमस्कार करण्यासाठी आग्रह केला. रोहित पवारांनी क्षणाचाही विलंब न करता, अजित पवारांना खाली वाकून नमस्कार केला. त्यानंतर रोहित पवारांना निवडून आल्याबद्दल अजित पवारांनी अभिनंदन केलं आणि थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर, काय झालं असतं विचार कर... असा टोलाही अजित पवारांनी रोहित पवारांना लगावला.
रोहित पवार आणि अजित पवारांच्या भेटीदरम्यान नेमकं काय घडलं?
रोहित पवार आणि अजित पवार आमने-सामने आले, रोहित पवारांनी अजित पवारांना पाहून हात जोडले...
अजित पवार : दर्शन घे दर्शन... काकाचं...
त्यानंतर रोहित पवारांनी अजित पवारांना वाकून नमस्कार केला...
अजित पवार : अरे ढाण्या थोडक्यात वाचलास... माझी सभा झाली असती तर, काय झालं असतं... बेस्ट ऑफ लक...
या संवादानंतर दोघेही निघून गेले...
रोहित पवार काय म्हणाले?
रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले की, "अजित पवार (Ajit Pawar) माझे काका आहेत, म्हणून मी पाया पडलो. शेवटी संस्कृतीप्रमाणे पाया पडणे माझी जबाबदारी आहे. माझी सभा झाली असती, तर अडचण झाली असती..असं विधान देखील अजित पवारांनी केलं. यावर रोहित पवारांना विचारले असता नक्कीच अजित पवारांनी (Ajit Pawar) सभा झाली असती तर वर-खाली झालं असतं, उलटंही होऊ शकलं असतं. पण ते बारामतीमध्ये अडकून पडले होते, त्यांना माझ्या मतदारसंघात येता आलं नाही. शेवटी अजित पवार मोठे नेते आहेत, निर्णय त्यांचा होता. त्यांचे आमदार देखील मोठ्या प्रमाणात निवडून आले आहे. चांगली गोष्ट आहे, मी त्यांचे अभिनंदन देखील केलं, असं रोहित पवार (Rohit Pawar) यांनी सांगितले."