मुंबई : खासगी दूध संघांकडून राज्यातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक होत आहे. तसेच शासनाने ठरवून दिलेले दर देखील खासगी संघ देत नाहीत. त्यामुळे सरकारने दुध दराबाबत एफआरपीचा (FRP) कायदा करावा, अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आमदार सदाभाऊ खोत यांनी केली आहे. राज्य सरकारने एफआरपीप्रमाणे दर नश्चित करणार असल्याचे आश्वासन दिले होते, ते कधी पूर्ण करणार असा सवालही सदाभाऊ खोत यांनी विधानपरिषदेत उपस्थित केला. दरम्यान, दूध दराच्या मुद्याबाबत राज्य सरकारने अहवाल तयार केला असून, लवकरच याबाबत निर्णय घेऊ असे वक्तव्य दुग्ध व पशू संवर्धन मंत्री सुनिल केदार यांनी केले आहे.
दुधाच्या मुद्यांवर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने आत्तापर्यंत दोन बैठका घेतल्या आहेत. याबाबत प्रस्तावही तयार केला आहे. याबाबत मंत्रीमंडळाच्या बैठकीत समिती गठीत करण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरच यावर निर्णय घेणार असल्याचे केदार यांनी सांगितले. दूध हे नाशीवंत आहे, त्यामुळे त्याबाबत वेगळा विचार करावा लागेल असेही केदार यांनी सांगितले. कोरोनाच्या काळात राज्यातील दूध उत्पादकांचे नुकसान होऊ नये यासाठी सरकारने भुकटी तयार केली. त्यामुळे दरामध्ये संतुलन साधण्यास मदत झाली. कोरोनाच्या काळात राज्य सरकारने 300 कोटी रुपये दूध उत्पादकांना दिले असल्याचे केदार यांनी सांगितले. दरम्यान, खासगी दूध संघाकडून जी शेतकऱ्यांची पिळवणूक होते, त्याबाबत कायदा करणार असल्याचेही केदार यांनी सांगितले.
सध्या राज्यात 35 टक्के दुधाचे संकलन हे सहकारी संस्था करतात, तर ६५ टक्के दुधाचे संकलन हे सहकारी दूध संघाकडून केले जाते. खासगी दूध संघ हे सरकारने सांगितल्याप्रमाणे दर देत नाहीत. त्यांच्याकडून शेतकऱ्यांची पिळवणूक होत असल्याचे सदाभाऊ खोत यांनी सांगितले. त्यामुळे दूध उत्पादकांची पिळवणूक करणाऱ्या खासगी संघावर कारवाई करावी, अशी मागणी खोत यांनी केली. फडणवीस सरकारच्या काळात दूध उत्पादकांना ५ टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे आता राज्य सरकारने दुधाला एफआरपीचा कायदा करावा अशी मागणी सदाभाऊ खोत यांनी केली.
12 लाख लिटर दूध बाहेरच्या राज्यातून येते
आजही महााष्ट्रात बाहेरच्या राज्यात 12 लाख लीटर दूध येते. त्यामुळे राज्यातील दूध दरावर परिणाम होतो. त्यावर आळा कसा घालायचा यावर निर्णय घेणार असल्याचे केदार यांनी सांगितले. राज्यातील दूध उत्पादकांना ज्यादाचे पैसे मिळावे, हा सरकारचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या:
- Corona New Guidelines : राज्यात लागू शकतात 'हे' निर्बंध; आजपासून नाईट कर्फ्यू, कार्यक्रमांवरही बंधनं
- स्पर्धेत हरला, पण प्रेमात जिंकला... अमरावतीतील दिव्यांग जोडप्याची अनोखी प्रेम कहानी