मुंबई : ‘महाराष्ट्र बंदनंतर आज दिवसभर दलित तरुणांची पोलिसांकडून धरपकड सुरु आहे. ती तातडीनं थांबवावी.’ अशी मागणी भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची त्यांच्या शिष्टमंडळानं भेट घेतली आणि त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.


भीमा-कोरेगाव हिंसाचाराप्रकरणी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटेंना अटक करणार का? असा सवालही त्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे.

‘आज आमच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी आमच्या मागण्या मान्य केल्या आहेत. पण मुख्यमंत्र्यांनी कारवाई करुन लोकांना विश्वास द्यावा.’ असं प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले.

‘कोम्बिंग ऑपरेशन तात्काळ बंद केलं जाईल याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. तसेच आरोपींवर कारवाई होईल आणि त्यांना अटकही केली जाईल. असंही मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितलं. पण संभाजी भिडेंना अटक होते की नाही ही गोष्ट आमच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे.’ असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

‘कालच्या बंदमुळे दलित समाजाचा राग एका जागी आम्ही कैद केला आहे. पण जास्त दिवसांसाठी हा राग कैद करता येणार नाही. त्यामुळे सरकारनं तात्काळ कारवाई करुन लोकांना विश्वास देणं गरजेचं आहे.’ असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

VIDEO :