मुंबई : कोकण आणि सह्याद्रीच्या डोंगररांगांसाठी दरडींच्या घटना नव्या नाहीत. दरवर्षी संततधार पाऊस सुरु झाला किंवा कमी कालावधीत अतिजास्त पाऊस झाला, की घाट रस्त्यांवर, मुंबई परिसरातील टेकड्यांच्या उतारावर वसलेल्या घरांवर दगड, माती घसरून येण्याच्या घटना घडतात. क्वचित प्रसंगी डोंगरावरून मोठे दगड घाटातून प्रवास करणाऱ्या गाड्यांवरही पडतात. अशा घटनांमध्ये बळी जाणाऱ्या नागरिकांची संख्या दरवर्षी सुमारे तीस ते चाळीस असते.
मात्र, काही वर्षे अशीही असतात जेव्हा कोकण आणि घाट क्षेत्रावर असामान्य अतिवृष्टी होते. अशा वेळी दरडींची संख्या आणि तीव्रताही मोठी असते. 2005, 2014 आणि आता 2021. ही गेल्या दोन दशकांतील अशी वर्षे आहेत, जेव्हा असामान्य पाऊस होऊन डोंगराच्या पायथ्याशी काही गावांवर दरडी कोसळल्या आणि अनेक लोक या दरडींखाली गाडले गेले.
महाराष्ट्रासाठी दरडी काही नव्या नाहीत, तर मग अशा घटनांचा अंदाज लावणे शक्य नाही का? हवामान खाते, जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया किंवा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अशा कोणालाच या घटना घडतील याची कल्पना येऊ शकत नाही का? याचे उत्तर समजून घेण्याआधी दरडी का आणि कधी कोसळतात ते समजून घेऊ.
दरड केव्हा कोसळते?
अभ्यासकांच्या म्हणण्या नुसार दरडींचे दोन प्रमुख प्रकार होतात. मानवी हस्तक्षेप असलेल्या दरडी आणि नैसर्गिक कारणांमुळे घडलेल्या दरडी. घाट रस्ते, डोंगर उतारावर बांधलेली घरे, तसेच कोणत्याही विकास कामांसाठी डोंगराच्या उताराला धक्का लावल्यास, त्याठिकाणी उत्खनन केल्यास दरडींसाठी आवश्यक स्थिती निर्माण होते. मोठा पाऊस झाल्यावर रस्त्याच्या किंवा घरांच्या वरच्या भागातील डोंगराच्या मातीत पाणी मुरते. त्याठिकाणी चिखल होतो. मातीत असलेले दगड आणि पाणी यांचे मिश्रण मग तोल जाऊन गुरुत्वाकर्षणाने खाली घसरून येते. दरवर्षी कोसळणाऱ्या बहुतांश दरडी या प्रकारातील असतात.
दुसऱ्या प्रकारची दरड ही तुलनेने दुर्मिळ मात्र मोठी हानी करणारी ठरते. एखाद्या वर्षी सलग चार पाच दिवस पावसाची संततधार सुरु राहिली आणि त्यानंतर एक किंवा दोन दिवस त्याच भागात अतिवृष्टी झाली, तर संपूर्ण डोंगराचे मातीचे कवच तकलादू बनते. डोंगराच्या एखाद्या भागात मातीची खोली आणि प्रमाण जास्त असेल तर त्या मातीत प्रचंड प्रमाणात पाणी साठते. पाणी साठलेला हा भाग डोंगर उतारावर असेल तर मातीच्या खाली असणाऱ्या खडकावरून माती, पाणी, दगड- धोंडे, झाडे यांचा ढिगारा उतारावरून वेगाने घसरून खाली येतो. अशा ठिकाणी खाली एखादे गाव असेल तर ते गाव या दरडीखाली दबले जाते. ही घटना इतक्या कमी वेळात घडते की डोंगरावरून दरड कोसळल्याचा आवाज कानावर पडल्यापासून काही सेकंदांत त्याखालील गावावर ही दरड येते. नागरिकांना बचाव करण्याची संधीच मिळत नाही.
दरड कोसळण्याची पूर्वसूचना मिळू शकते का?
आता समजून घेऊयात, अशा घटनांची पूर्वसूचना देणे शक्य आहे का? त्याचे उत्तर आहे होय. पुण्यातील सेंटर फॉर सिटिझन सायन्स या संस्थेने माळीण दुर्घटनेचा शास्त्रीय अभ्यास करून अशा घटनांची पूर्वसूचना देण्याची सतर्क ही सुविधा सुरु केली आहे. 2015 पासून दरडींच्या पूर्वसूचना देण्याचे काम सतर्कतर्फे केले जाते. दरड प्रवण क्षेत्रांवर होणाऱ्या पावसावर सतत नजर ठेवून हे अंदाज दिले जातात. आत्ताही 21 आणि 22 जुलैला घाट क्षेत्रात दरडी कोसळण्याची सर्वाधिक शक्यता असल्याचे इशारे सतर्कने दिले होते.
आता प्रश्न येतो हे इशारे दिले तरी मग लोकांचे जीव कसे गेले?
2014 मध्ये माळीण दुर्घटनेनंतर मोठी चर्चा झाली, अशा घटनांचे अंदाज कसे दिले जात नाहीत. आता अंदाज मिळत आहेत, तर त्यांना गांभीर्याने घेतले जात नाही. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने सतर्क सारख्या यंत्रणांच्या मदतीने खास दरड प्रवण गावांसाठी आणि घाट रस्त्यांसाठी कृती योजना आखायला हवी आणि ती अंमलातही आणायला हवी. नाहीतर पुढील घटनांच्या वेळी पुन्हा हीच चर्चा, राजकारण्यांचे दौरे, आर्थिक मदत हे चक्र असेच सुरु राहील.