रायगड :  रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यामधील तळीये गावात दरड कोसळून जवळपास 36 जणांचा मृत्यू झालाय. या तळीये गावाला आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट देऊन तेथील नागरिकांना आधार दिला. तुमच्यावर कोसळलेला प्रसंग मोठा आहे. त्यामुळे तुम्ही स्वत:ला सावरा. बाकीच्या गोष्टी सरकारवर सोडा. आम्ही तुमचं पुनर्वसन करू. सर्वांना मदत दिली जाईल, अशा शब्दांत आधार देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तळीये गावातील मृतांच्या नातेवाईकांचे अश्रू पुसले. 


मुख्यमंत्री आज दुपारी सव्वा दोनच्या सुमारास तळिये गावात पोहोचले. यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री आदिती तटकरे, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, परिवहन मंत्री अनिल परब, खासदार सुनील तटकरे, आमदार भरत गोगावले, मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि जिल्हाधिकारी निधी चौधरी आदी उपस्थित होते. 




मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घटनास्थळी येताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांना घटनेची माहिती दिली.  मुख्यमंत्र्यांनी  स्थानिकांचं म्हणणं ऐकून घेतलं. त्यांचं सांत्वन करत त्यांना धीर दिला. 


रायगड जिल्ह्यातील तळीये दुर्घटनेवर मुख्यमंत्र्यांकडून शोक; मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर!


तळीयेतील गावकऱ्यांनी अजिबात काळजी करू नये. सरकार त्यांना सर्व मदत करेल, संपूर्ण नुकसान भरपाई दिली जाईल. त्यांचे योग्य पुनर्वसन करू
अशा घटना पाहता डोंगर उतार आणि कडे- कपाऱ्यात राहणाऱ्या वाड्या- वस्त्या यांना स्थलांतरित करण्याचे नियोजन करण्यात येईल. पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा नद्यांचे पाणी पावसाळ्यात वाढून पूर परिस्थिती उद्भवते. यासंदर्भात काहीतरी मार्ग काढण्यासाठी पाण्याचे नियोजन करण्याची गरज आहे, त्यादृष्टीने जल आराखडा तयार केला जाईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. 


Raigad Talai Update : मोठी दुर्घटना! रायगड जिल्ह्यातील तळीये गावावर दरड कोसळून जवळपास 36 जणांचा मृत्यू, आकडा वाढण्याची भीती


ही आपत्ती इतकी मोठी होती की मदतीला त्याठिकाणी पोहचताना जवानांना आणि पथकाला अडचणी आल्या. कारण सगळ्या सामुग्रीनिशी त्यांना बचाव कार्य करायचे होते. राज्य शासन आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी तयार होते. केंद्राने देखील सहाय्य केले, लष्कर, एनडीआरएफ सर्वांनीच मदत केली आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.