रायगड : ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सकपाळ यांची गाडी मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर नादुरुस्त झाली. त्यावेळी व्हॉट्सअॅप ग्रुप मदतीला धावून आला.


सलग तीन दिवस आलेल्या सुट्ट्यांमुळे मुंबई-पुणे एक्सप्रेस मार्गावर शनिवारी सकाळपासून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान शनिवारी मध्यरात्री 12.30 च्या सुमारास मुंबई-पुणे एक्सप्रेस मार्गावर सिंधुताई सकपाळ यांची गाडी नादुरुस्त झाल्याची माहिती खोपोली येथील व्हॉट्सअप ग्रुपला मिळाली होती.

यामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेस मार्गावर अपघातग्रस्तांच्या मदतीला धावणाऱ्या 'अपघातग्रस्तांच्या मदतीला' या व्हॉट्सअप ग्रुपचे सदस्य हे तातडीने सिंधुताई यांच्या गाडीचा शोध घेत होते. यावेळेस खोपोलीजवळ सिंधुताई यांची गाडी नादुरुस्त झाल्याचे आढळून आले.



सिंधुताई यांना पुढे नेण्यासाठी दुसरी गाडी बोलावण्यात आली. त्यावेळी 'अपघातग्रस्तांच्या मदतीला' धावणाऱ्या सदस्यांनी सिंधुताई आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांसाठी तातडीने जेवणाची व्यवस्था केली.

दरम्यान, नादुरुस्त झालेल्या गाडीमुळे सुमारे दीड तासाने दुसऱ्या गाडीने सिंधुताई पुण्याच्या दिशेने रवाना झाल्या. यावेळेस सिंधुताईंनी अपघातग्रस्तांच्या मदतीला धावणाऱ्या ग्रुपचे कार्य हे जखमेवर मायेची फुंकर घालण्याचे काम असल्याचे म्हटले आहे.